स्कूटर विक्री 9, दुचाकीच्या विक्रीत 4 टक्केंची वाढ अपेक्षित
देशाच्या वाहन क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : देशाच्या वाहनक्षेत्रात एक ऐतिहासिक बदल घडत आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार, पुढील 10 वर्षांत स्कूटरची विक्री मोटरसायकलपेक्षा जास्त होईल. यामागे वेगाने होणारे शहरीकरण, कार्यबलामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि दुचाकींचे वेगाने होणारे विद्युतीकरण ही प्रमुख कारणे असतील.
इक्विरस सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, 2025 ते 2030 या आर्थिक वर्षांदरम्यान स्कूटरच्या विक्रीत दरवर्षी सरासरी 9 टक्के वाढ अपेक्षित आहे. याउलट, मोटरसायकलच्या विक्रीत सरासरी वार्षिक वाढ केवळ 4 टक्के अपेक्षित आहे. या तफावतीचे एक प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रिक दुचाकींचा झपाट्याने होणारा विस्तार, ज्यात स्कूटर्सनी आपले स्थान पक्के केले आहे.
जुन्याऐवजी नवीन वस्तू घेण्याचा ट्रेंड वाढतोय
अहवालानुसार, येत्या काही वर्षांत भारतात जुन्या गाड्यांऐवजी नवीन गाड्या घेण्याचा ट्रेंड वाढेल. टीव्हीएस मोटरचे सीएमडी सुदर्शन वेणू म्हणाले की, स्कूटर्सनी गेल्या दोन वर्षांत विलक्षण वाढ दर्शविली आहे. हा ट्रेंड सुरूच राहील. सध्या ग्रामीण भागांमध्ये आणि एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये मोटरसायकलचे वर्चस्व आहे, परंतु शहरी भारतातील लोकांची पसंती स्कूटरकडे वळत आहे.
4 वर्षांत ईव्ही-स्कूटर्स 38 टक्केवर पोहोचतील
? इलेक्ट्रिक दुचाकींचा बाजारहिस्सा सध्या 10 टक्केपेक्षा कमी आहे, तो 2030 पर्यंत 19टक्के आणि 2040 पर्यंत 50टक्केपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
? दुचाकी विभागात इलेक्ट्रिक स्कूटर्स आघाडीवर राहतील. असा अंदाज आहे की 2030 पर्यंत त्यांचा वापर 38 टक्के आणि 2040 पर्यंत 80टक्के होईल.
? रेंजची चिंता आणि जास्त किमतींमुळे 2030 पर्यंत इलेक्ट्रिक मोटरसायकलचा वापर 5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.