एससीओ परिषद : संरक्षणमंत्र्यांचा दणका
जगाच्या राजकारणामध्ये भारताची शक्ती जशी वाढत आहे तशी भारत आपली सक्रियता सिद्ध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 7 शिखर परिषदेच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका भेटीचे निमंत्रण नाकारले आणि त्यांनी भारत-पाक युद्धाच्या वेळी आपण मध्यस्थी केल्याचा जो दावा केला होता तो त्यांनी दूरध्वनीवर संपर्क करून साफ नाकारला. या प्रकारच्या धाडसी आणि आत्मविश्वास पूर्ण अभिव्यक्तीचे आणखी एक आगळे वेगळे रूप शांघाय शिखर परिषदेस दिसून आले. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेत दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आणि चीन व पाकिस्तान यांचा डाव पूर्णपणे उधळून लावला. दोन दिवसांच्या परिषदेनंतर संमत केल्या जाणाऱ्या संयुक्त निवेदनावर सही करण्यास भारताने नकार दिला व आपली राष्ट्रीय अस्मिता सिद्ध केली असे म्हणावे लागेल. राजनाथ सिंह यांच्या या ठाम भूमिकेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची ही भूमिका दहशतवादाच्या प्रश्नावर चीनने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेचे वस्त्रहरण करणारे पाऊल ठरले आहे.
नव्या युगाची प्रचिती
जी 7 शिखर परिषदेच्या वेळी भारताने दाखविलेली धाडसी आणि साहसी भूमिका जशी महत्त्वाची आहे तशी शांघाय संघटनेच्या संरक्षण मंत्री संमेलनातील भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे.
सक्षम भूमिका आणि ठाम निर्णय यावरून भारताच्या परराष्ट्र धोरणात आणि संरक्षण धोरणात नवे युग सुरू झाल्याची प्रचिती येत आहे. कुठलेही राष्ट्र जेव्हा बलशाली बनते, स्व सामर्थ्यावर उभे राहते तेव्हा त्या देशाला आंतरराष्ट्रीय राज्यकारणात आपली मते आणि भूमिका भक्कमपणे मांडता येतात. शांघाय शिखर परिषदेच्या अंतिम मसुद्यावर सही करण्यास भारताने नकार दिला त्याचे कारण म्हणजे या दस्तऐवजामध्ये पहलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता. भारताला वाटणारी चिंता लक्षात घेता जागतिक व्यासपीठावर दहशतवाद विरोधात ठाम व निर्णायक भूमिका घेणे आता आवश्यक झाले आहे. संयुक्त निवेदनामध्ये पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार टीका केली आणि पाक, चीन यांच्या मतलबी धोरणाचे वस्त्रहरण केले. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत नव्हती आणि त्यामुळे संबंध जगाला हादरा बसला आहे. अमेरिका आणि चीन सारख्या बड्या राष्ट्रांना स्पष्टपणे नकार देण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आले आहे ही समाधानाची बाब होय. चला शांघाय सहकार्य संघटना ही आशिया खंडातील राष्ट्रांची एक महत्त्वाची प्रादेशिक संघटना होय. त्यामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक विषयांचा उहापोह होतो. यावेळी दक्षिण आशियावर दहशतवादाचे ढग जमलेले आहेत आणि पाकिस्तान भारतावर छुपे दहशतवादी हल्ले करत असतो. त्यातही पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप भारतीयांनी प्राण गमावले. त्यामुळे भारताला वाटणारी चिंता सर्व जागतिक स्तरावर प्रतिबिंबित केली जात आहे आणि शांघाय परिषदेत त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्य होते. या परिषदेत राजनाथ सिंह यांनी केलेले भाषण अत्यंत मुद्देसूद अभ्यासपूर्ण तसेच तर शुद्ध युक्तिवादावर आधारलेले होते. त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे दर्शन प्रस्तुत भाषणामध्ये झाल्याचे दिसून येते.
नकार का दिला?
राजनाथ सिंह यांनी या परिषदेच्या अंतिम संयुक्त निवेदनावर सह्या करण्यास नकार का दिला, या मागील त्यांची प्रामाणिक आणि परखड भूमिका समजून घेतली पाहिजे. दहशतवादाच्या विरोधात कणखर आणि ठाम भूमिका घेऊन त्यांनी सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी याबाबतीत कोणीही दुटप्पीपणाची भूमिका घेता कामा नये, असे सांगून चीन आणि पाकिस्तान यांच्या युतीला जोरदार तडाखा दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खाजा-आरिफ आणि चीनचे संरक्षण मंत्री डॉन जून हे सुद्धा या परिषदेस उपस्थित होते. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना राजनाथ सिंह यांनी त्यांची जागा दाखवून दिली आणि आपल्या देहबोलीद्वारे त्यांना स्पष्टपणे नाकारले. ही बाब सुद्धा भारताच्या वाढत्या प्रभुत्वाचे सूचिन्ह आहे. दहशतवादाच्या प्रश्नावर त्यांनी आपल्या समक्ष नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आणि संयुक्त निवेदनातील त्रुटी आणि उणिवा लक्षात घेऊन त्यावर सही करण्यास साफ नकार दिला. एक तर जाहीरनामाच्या मसुद्यामध्ये पहेलगाम हल्ल्याचा उल्लेख नव्हता. दुसरे म्हणजे हा मसुदा पाकिस्तानच्या बाजूने कललेला होता. पाकिस्तानचा पुरस्कृत दहशतवाद हा संबंध जगापुढे अनेक समस्या निर्माण करणारा ठरला आहे आणि जगातील लोकशाहीचा गळा घोटत आहे. अशावेळी या दहशतवादाला सर्वांनी एकमुखाने विरोध करणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी आपल्या भाषणात साररूपाने मांडले. तसेच त्यांनी या मसुद्यातील दहशतवादी गटांना महासंहारक शस्त्रास्त्रs पुरविणे आणि दहशतवादाला खतपाणी घालणे हे सुद्धा पाकिस्तान सारख्या देशाचे राजकारण. यासाठी त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले. पाकिस्तान सारखे देश जगाच्या शांतता व समृद्धीस धोका पोहोचविणारे आहे हेही त्यांनी आपल्या भाषणात विशेषत्वाने नमूद केले आहे. हे पैलू सुद्धा महत्त्वाचे आहेत. राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणामध्ये दहशतवादाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या दुर्लक्षित पैलूकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे दहशतवादाशी दहशतवादाशी सामना करताना निर्णायक व ठाम कृती करणे आवश्यक आहे. त्यांची ठाम भूमिका ही भारताच्या वाढत्या प्रभुत्वाचे द्योतक आहे.
भू राजनैतिक विश्लेषण
पाकिस्तान हा दहशतवादाचा पोशिंदा आहे आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवादामुळे अनेक दहशतवादी संघटना जगभर हिंसाचार घडवून आणत आहेत. या दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारताला भक्कम कारवाई करून प्रत्युत्तर द्यावयाचे आहे.
ऑपरेशन सिंदूर अद्यापही संपलेले नाही. राजनाथ सिंह यांनी केलेले दहशतवादाचे विश्लेषण अनेक दृष्टीने मौलिक आहे. त्यांच्या विवेचनाचे भूराजनैतिक दृष्टीने आकलन केले असता असे दिसते की आपल्या लष्कराऐवजी दहशतवादी संघटनांचा उपयोग करून जगभरामध्ये धुडगूस घातला आणि जगाच्या लोकशाहीला खग्रासग्रहण लावण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे. अशा या दहशतवादी राष्ट्राला चीनसारखा साम्यवादी देश पाठीशी घालत आहे आणि त्याचे समर्थन करून भारतासारख्या लोकशाही राष्ट्रापुढे अनेक बिकट समस्यांची मालिका उभा करत आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्या संयुक्त आघाडीला छेद देण्यासाठी जगभरात जनमत संघटन करणे आवश्यक आहे. ज्या उदात्त हेतूने शांघाय सहकार्य संघटनेची इसवी सन 15 जून 2001 रोजी स्थापना झाली. या संघटनेने ऊर्जा दळणवळण वाहतूक आर्थिक व सांस्कृतिक आधार प्रधान या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य बजावले आहे. या संघटनेचे दहा सदस्य असून 14 संवाद भागीदार आहेत व दोन निरीक्षक देश आहेत. त्याचबरोबर चार पाहुण्यांची उपस्थिती असते. त्या संघटनेचे आजचे स्वरूप आणि तिच्या पुढील उद्याची आव्हाने याचा विचार करता दहशतवाद ही एक प्रमुख समस्या आहे. संबंध जगभरातील दहशतवादाचे जाळे पाकिस्तानात निर्माण झाले आणि ते जगभर पोहोचविले गेले. त्यामुळे जगातील सर्व राष्ट्रांमध्ये अशांतता व अस्थिरता निर्माण झाली आहे. ती जर दूर करावयाची असेल तर दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. आपल्या हिताचे दहशतवादी कृत्य असेल तर त्याचे समर्थन करावयाचे आणि जगाच्या इतर देशावर अशा कारवाया झाल्या तर मग मात्र मूग गिळून बसावयाचे या प्रकारचे दुटप्पी धोरण आता चालणार नाही. खुद्द अमेरिकेने जेव्हा न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉनवरचे हल्ले पाहिले तेव्हा त्यांना दहशतवादाचे भयावह रूप लक्षात आले. चीन आज पाकिस्तानचे समर्थन करत असला तरीही पुढे चालून एकदा का चीनवर जर दहशतवादी हल्ला झाला तर मग चीनच्या लक्षात येईल की दहशतवाद हा भस्मासुर आहे व तो कोणालाही गिळू शकतो. त्यामुळे कुठल्याही बाबतीत दहशतवादाचे समर्थन करणे हानिकारक आणि दूरगामी विचार करता, लोकशाहीला धोकादायक आहे, ही गोष्ट भारताने जगाच्या सर्व प्रमुख देशांना दाखवून दिली आहे. जगातील प्रमुख देशांमध्ये भारताने सात विरोधी पक्षांची शिष्टमंडळे पाठविली आणि भारताने पहेलगामला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईची माहिती जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांना देण्यात आली आहे. आता सांगा शांघाय परिषदेमध्ये झालेल्या विचार मंथनात भारताने आपला दृष्टिकोन स्पष्टपणे मांडला आहे आणि पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. भारताचा दृष्टिकोन स्वच्छ, स्पष्ट आणि रोखठोक आहे याची प्रचिती येत आहे. त्यामुळे सांगा शिखर परिषदेत भारताने घेतलेली भूमिका ही एक वळण देणारी घटना आहे असे म्हणावे लागेल.
- डॉ. वि ल धारूरकर