महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साहित्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन प्रतित व्हावा

10:54 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्मिता पोतनीस : मंथन सोसायटी-हिंदवाडी महिला मंडळ आयोजित साहित्य संमेलन उत्साहात

Advertisement

बेळगाव : विज्ञानातील रुक्षपणा घालवून विज्ञानालाही मोहोर आणू शकते, ते साहित्य होय. म्हणूनच जेव्हा विज्ञानाचे साहित्याशी नाते जोडले जाते, तेव्हा विज्ञान आणि साहित्य या दोघांनाही पूर्णत्व येते. विज्ञान आणि साहित्याच्या संगमाने साहित्याला नवा रंग चढतो आणि विज्ञानातील सपकपणा जाऊन त्याच्या चमत्कृतींची कल्पना येते. मात्र, विज्ञान लेखकाचा दृष्टिकोन वैज्ञानिक असावा की नाही? यापेक्षा लेखकाच्या साहित्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन प्रतित होणे महत्त्वाचे, असे विचार विज्ञान लेखिका स्मिता पोतनीस यांनी व्यक्त केले. मंथन कल्चरल अँड वेल्फेअर सोसायटी व हिंदवाडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 37 व्या महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सामर्थ्य मंदिर, टिळकवाडी येथील डॉ. प्रल्हाद जोशी व्यासपीठ येथे रविवारी एकदिवशीय संमेलन पार पडले. व्यासपीठावर मंथनच्या सर्व कार्यकारिणी सदस्या उपस्थित होत्या.

Advertisement

स्मिता पोतनीस म्हणाल्या, साहित्य म्हणजे अभिव्यक्तीचे साधन आणि ती व्यक्त करतो तो लेखक. विज्ञान साहित्याच्या अनुषंगाने विचार करता त्यामध्ये लेख, कथा, कादंबरी, काव्य, नाटक, एकांकिका असे सर्व प्रकार येतात. विज्ञान लेख वर्तमानातील संशोधन व विश्वात असलेल्या पण नव्याने समजलेल्या गोष्टी सांगण्यासाठी लिहिले जातात. स्फुटलेख म्हणजेच वृत्तपत्रात विज्ञान विषयाची माहिती थोडक्यात दिली जाते. काही विज्ञान लेख समीक्षापर असतात. परंतु, जनसामान्यांपर्यंत सोप्या पद्धतीने विज्ञान पोहोचवायचे असेल तर ललित विज्ञान लेख या प्रकाराला प्राधान्य मिळते. यामध्ये विज्ञान आणि ललित यांचा मेळ घालावा लागतो. यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांना सहजी समजेल अशा पद्धतीने लेखन करणे आवश्यक आहे. मराठीमध्ये विज्ञान कथेच्या लेखनाला 1990 मध्ये कृष्णाजी आठले यांनी जुल्स व्हर्न या लेखकाच्या कथेचा अनुवाद केला आणि तेथून सुरुवात झाली. आधुनिक विज्ञान कथांचा उदयकाल 1975 मध्ये झाला. यामध्ये जयंत नारळीकर, निरंजन घाटे, दि. बा. मोकाशी, नारायण भारप, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर यांचा अंतर्भाव होतो.

मराठी विज्ञान कथा ही मराठी मातीतली असते. कितीही प्रगत झालो तरी आपले विचार आपल्या संस्कृतीशी जुळलेले असतात. त्यामुळे विज्ञान कथेत अशा विचाराचे प्राधान्य जाणवते आणि वाचक तशा कथांशी जोडला जातो. विज्ञान संकल्पनांचा आधार घेऊन माणसांनी माणसांसाठी माणसांच्या भविष्यातील बदलत्या जगाची कल्पना करून केलेले मनोरंजक चित्रण म्हणजे विज्ञान कथा होय, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी विज्ञान लेखकाच्या साहित्याचा आढावा घेतला व विज्ञान आणि साहित्य या प्रकारात येणारे सर्व पैलू उलगडून दाखविले. रुस्तुम रतनजी यांच्या स्मरणार्थ झालेल्या दुसऱ्या सत्रात लीना बोकील यांची प्रकट मुलाखत माधुरी शानभाग यांनी घेतली. लीना मूळच्या बेळगावच्याच असून इस्रोमध्येही त्यांनी काम केले आहे. बालपणापासूनच विज्ञान शाखेची आवड होती. भौतिक शास्त्र हा आवडता विषय होता. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इस्रो, रमण इन्स्टिट्यूट, आयआयटी येथे काम केले. एव्हिएशन विभागातही काम केले. विद्यापीठात संधी होती पण काहीसे डावलले जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आपण तेथून बाहेर पडलो, असे त्या म्हणाल्या.

मोठमोठ्या आयआयटी कॉलेजमधून शिकल्यावरच संधी उपलब्ध होते, हा गैरसमज काढून टाका. किंबहुना अलीकडे लहान गावातील मुलांना संधी मिळावी व त्यांनी न्यूनगंड दूर करावा यासाठी आपण काम करत आहोत, असे त्या म्हणाल्या. इस्रो, नासा यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी पैशांपेक्षा राष्ट्र उभारणी हे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे महासत्ता होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रॉकेट सायन्स, नासा, स्पेस हे फक्त पुरुषांचेच क्षेत्र आहे, असे मुळीच नाही. स्पेस ही शाखा अमर्याद आहे. त्यामुळे स्वत:ला मर्यादित करू नका. लहान-मोठे शहर असा फरक करू नका. सातत्याने काम करत रहा. अपयश आले तरी ते पचवा. त्यातूनच यश मिळणार आहे, असे सांगतानाच डीआरडीओ, इस्रोमध्ये अनेक महिला कार्यरत होत्या, आहेत आणि आपणही मुलींनी या क्षेत्राकडे वळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. चांद्रयान-3 मध्ये महिलांची संख्या अधिक होती. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आध्यात्म यांचा समन्वय या मोहिमेत घातला गेला. चांद्रयान उतरले त्या जागेला शिवशक्ती हे अर्थपूर्ण नाव देण्यात आले आहे. कारण शिव आणि शक्ती या दोहोंचा संगम या अभियानात होता. चांद्रयान मोहिमेमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान वापरायचे ठरले होते. माणूस आणि मशीन यांचा समन्वय येथे साधला गेला होता. त्यामुळे ‘अच्छे दिन आयेंगे, आनेवाले हैं’ असा विश्वास व्यक्त करताना स्पेस किंवा अंतराळ शास्त्र हे बहुआयामी आहे आणि गगनयान मोहिमेसाठी असंख्य पायलट लागणार आहेत, हे तरुणाईने लक्षात घ्यावे, असे त्या म्हणाल्या. अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा उपयोग सामान्यांसाठी हवा, हे कलाम यांचे स्वप्न आपण कधीही विसरता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

ना. धों. महानोर

निसर्गकवी म्हणून गौरविले गेलेले ना. धों. महानोर यांच्या कवितेमधून निसर्ग वेगळा काढता येत नाही. कारण त्यांनी आपले सर्वस्वच निसर्गाला दिले होते. निसर्गातील रंग, नाद, रुपासह त्याचे अनेक विभ्रम ना. धों. महानोरांनी टिपले. परिस्थितीने ते खचले तरी साहित्याने त्यांना पुन्हा उभे केले, असे मत डॉ. मनीषा नेसरकर यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘समग्र महानोर’ या विषयावर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मराठी कवितांमध्ये निसर्ग अनेकदा व्यक्त झाला आहे. परंतु, महानोरांचे वैशिष्ट्या हे की त्यांच्या कवितेमध्ये निसर्ग आहे तसा येतो. जणू आपला देहच त्यांनी निसर्गाला दिला आहे. रान हे त्यांच्यासाठी ध्यान आहे. त्यांच्या काव्यातून हिरवी अनुभूती व्यक्त होते. शिवाय त्यांचे अनुभव हे वैयक्तिक पातळीवर न राहता वैश्विक पातळीवर उतरतात.

महानोर यांनी साहित्याबरोबरच राजकारण आणि चित्रपट या क्षेत्रातही काम केले. कलावंतांचे प्रतिनिधी म्हणून ते प्रश्न मांडत राहिले. शेतकऱ्यांची आत्महत्या ही काळोखी वाट आपली नाही असे ते सतत सांगत राहिले आणि कर्जमाफीला त्यांचा विरोध होता. ज्यामुळे शेतकरी पांगळा होईल, अशी भीती त्यांना वाटत होती, असेही डॉ. नेसरकर यांनी नमूद केले. प्रारंभी आरती, भारती, गुरव, सोनाली पाटील व सहकारी यांनी स्वागतगीत व ईशस्तवन म्हटले. मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पोतनीस यांचा परिचय श्रुती परांजपे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संजना सामंत यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये अनुषा कुलकर्णी यांनी तर तिसऱ्या सत्रामध्ये लक्ष्मी तिगडी यांनी सूत्रसंचालन केले. चौथ्या सत्रामध्ये ‘प्रवास एका शाहिराचा’ हा नीता कुलकर्णी दिग्दर्शित संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर झाला. मोनाली परब यांनी आभार प्रदर्शन केले. राजश्री हेब्बाळकर यांनी राष्ट्रगीत म्हटले. प्रवेशद्वारासमोरील सुंदर रांगोळी राजश्री मिरजकर यांनी रेखाटली होती.

संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल

मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी व हिंदवाडी महिला मंडळ आयोजित महिला साहित्य संमेलनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचा निकाल पुढीलप्रमाणे-

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article