विज्ञान-नवतंत्रज्ञान हीच विकासाची गुरुकिल्ली
दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन प्रभाव’ शोधला. हा शोध त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवून देणारा ठरला. या अभूतपूर्व शोधासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेनं 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारत सरकारनं हा प्रस्ताव स्वीकारला. 1987 पासून, हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
या पुरस्कार प्राप्तीनंतर भारताचे विज्ञान विषयातील नाव जगभरात पोहोचले. राष्ट्रीय विज्ञान दिन सी. व्ही. रामन यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या वैज्ञानिक दिनदर्शिकेत एक महत्त्वाचा दिवस आहे. सर सी. व्ही. रामन यांना नोबेल मिळाले. तेंव्हापासून भारत नोबेलची प्रतीक्षा करतो आहे. नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठे आपल्याकडे होती. ‘ऑक्सफर्ड’ त्याच सुमारास सुरु झाले. ‘ऑक्सफर्ड’ जगप्रसिद्ध झाले पण आपली विद्यापीठे काळाबरोबर का टिकली नाहीत? आत्मनिर्भर म्हणायचं पण अन्नधान्य पासून उच्च तंत्रज्ञान सगळेच बाहेरून मागवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. संशोधनाकडे अक्ष्यम दुर्लक्ष्य करण्याचे हे परिणाम आहेत. देशात शास्त्रज्ञ, संशोधक यांना मानसन्मान मिळत नाही आणि पुरेसे प्रोत्साहनही मिळत नाही. हे बदलायला हवे.
यावर्षी, राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम बनवणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवला गेला आहे. हा दिवस फक्त सर सी. व्ही. रामन यांच्या कामगिरीचं स्मरण करण्यापुरता मर्यादित नाहीय. राष्ट्रीय विज्ञान दिनाचं उद्दिष्ट वैज्ञानिक जागरूकता वाढवणं आणि तरुणांना विज्ञानात करिअर करण्यास प्रोत्साहित करणं हे आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारताच्या वैज्ञानिक क्षेत्राच्या प्रगतीचा अविभाज्य भाग बनला आहे. भारत जसजसा विकसित होत आहे, तसतसा राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक जागरूकता वाढविण्यासाठी आणि शास्त्रज्ञ व नवोन्मेषकांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ होत चालले आहे. हा दिवस फक्त एक औपचारिकता नसून देशाच्या वैज्ञानिक प्रवासाची, शोधांची आणि नव्या पिढीतील जिज्ञासेची आठवण करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. 2026 मध्ये या दिवसाची थीम ‘वुमन इन सायन्स:
कॅटलायझिंग विकसित भारत’ ही असणार आहे. ही थीम विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या सहभागाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. विज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन संशोधनामुळे प्रगती होत आहे. विज्ञानाची गोडी लावून नवीन संशोधनाची निर्मिती करणे, नवीन संशोधन उदयास येणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध विज्ञान शाखांमध्ये नव्या संशोधनाला प्रोत्साहन देतो. यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक नवीन शोध घेण्यासाठी प्रेरित होतात आणि विज्ञान क्षेत्रात प्रगती घडवते. आता विज्ञान आणि रुढी परंपरा याला भेदून नवीन संशोधन कसे समाजासाठी उपयुक्त ठरू शकते, यावर भर दिला जातो.
आपण ज्या जगात राहत आहोत ते पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाचा वापर करत असतो. मोबाईल फोन, इंटरनेट, वीज, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय उपचार, शिक्षण व्यवस्था आणि शेती क्षेत्र या सर्व गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. विज्ञानाने मानवाचे जीवन अधिक सुरक्षित केले आहे. पूर्वी अनेक रोगांवर उपचार उपलब्ध नव्हते, परंतु आज आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अनेक जीव वाचवता येत आहेत. लसीकरण, शस्त्रक्रिया तंत्रज्ञान आणि औषध संशोधन यामुळे मानवाचे आयुष्य वाढले आहे. भारताने गेल्या काही दशकांत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत. उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानामध्ये भारताने जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या देशातील वैज्ञानिक संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्था विज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्य करत आहेत. भविष्यात भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल, परंतु त्याचा योग्य वापर करणे देखील आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास समाजाचा विकास वेगाने होऊ शकतो. राष्ट्रीय विज्ञान दिवस आपल्याला शिकवतो की ज्ञानाचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे. विज्ञान आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते.
-प्रा. डॉ. गिरीश नाईक