'अपार थ्री' साठी शिक्षकांसाठी धावपळ
विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एका क्लिकवर
जिल्ह्यातील शिक्षकांची विद्यार्थी नोंदीसाठी धावपळ
शाळाबाह्य विद्यार्थांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे
कोल्हापूरः विजय पाटील
एक राष्ट्र एक ओळखपत्र, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करून पुन्हा त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता अपार आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे अपार कार्ड काढण्याचे शाळांना आदेश दिले आहेत. त्यामुळे मुदतीत काम पुर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांची धावपळ सुरु आहे.
‘आधारकार्ड’च्या धर्तीवर पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना आता अपार कार्ड दिले जाणार आहे. ‘अपार’मधून डिजीलॉकरच्या सहाय्याने शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या नोंदी पाहता येणार आहेत. प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांना ‘अपार थ्री’ आयडीसंदर्भात माहिती सांगून त्यांचे संमतीपत्र घ्यायचे आहे. त्यासाठी वाढीव मुदत मिळणार नाही, पण ‘एक राष्ट्र एक ओळखपत्र’ या धोरणानुसार देशातील सर्वच विद्यार्थ्यांना ते कार्ड दिले जाणार आहे.
या कार्डमुळे शैक्षणिक कागदपत्रांऐवजी आता या कार्डवरच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्या, पण विधानसभा निवडणुकीमुळे या कामाला दिरंगाई झाली आहे. वर्गशिक्षक, मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ‘अपार’ कार्डसाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्याची कार्यवाही सुरु झाली असून पालकांतून त्याला प्रतिसाद मिळत आहे.
‘अपार’ आयडीचे फायदे
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांचा प्रगती अहवाल, शाळाबाह्य विद्यार्थी, अर्ध्यातून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता येईल. आयडी प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा एका जिह्यातून, राज्यातून दुसऱ्या राज्यात, जिल्ह्यात पाठवणे सुलभ होईल. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे ‘अपार’ आयडी विद्या समिक्षा केंद्राला जोडण्यात येणार असून त्या माहितीवरून मूल्यमापन करून नवीन उपक्रम राबवता येईल. ‘अपार’ला ‘डिजिलॉकर‘ जोडले जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांनी शिक्षणात साध्य केलेले लक्ष्य, दहावी-बारावी बोर्डाचे निकाल, एकत्रित प्रगती अहवाल, अन्य उपक्रमांमधील यश हे त्यावरुन पाहता येणार आहे.