विद्यार्थी हिताच्यादृष्टीनेच एप्रिलपासून शाळांचा निर्णय
एससीईआरटी संचालक मेघना शेटगावकर यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ पणजी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासक्रम, उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अधिक वेळ देता यावा या उद्देशाने एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो योग्य आहे, असे मत एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी व्यक्त केले. शनिवारी पर्वरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो आणि सरिता गाडगीळ यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. झिंगडे यांनी, एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात पालकांना विश्वासात घेतले नाही या विधानात काही तथ्य नसल्याचे सांगितले. ’एनईपी’ मसुदा आल्यानंतर त्यासंदर्भात तालुकावार बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामाध्यमातून आलेल्या हरकतीमधील बहुतांश मुद्दे समान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सौ. शेटगांवकर यांनी अधिक माहिती देताना एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात कुणाच्या हरकती असल्यास शिक्षण खात्याकडे पाठवाव्यात, अशी अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार एकूण 4047 हरकती प्राप्त झाल्या. त्यात 3946 वैयक्तिक तर पालक-शिक्षक संघांकडून 89, त्याशिवाय विविध संघटनांकडून 9 आणि राजकीय नेत्यांकडून 3 हरकतींचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने एप्रिलमधील असह्य उकाडा व तो नियंत्रित ठेवण्यासाठी शाळांमध्ये साधनसुविधांचा अभाव, पाठ्यापुस्तकांची उपलब्धता, आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन व पालकांना विश्वासात न घेता घेण्यात आलेला निर्णय असल्याची कैफियत मांडण्यात आली होती. या हरकतींची सुकाणू समितीकडून छाननी करण्यात आली व त्यांचे मुद्देसूदपणे खंडन करण्यात आले. त्यामुळे एप्रिलपासूनच नवीन शैक्षणिक वर्ष सुऊ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले