साताऱ्यात शाळकरी मुलीचा कबड्डी खेळताना मृत्यू
सातारा :
साताऱ्यातील कन्या शाळा या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाळेतील अक्षदा विजय देशमुख (वय 15, रा. यादोगोपाळ पेठ सातारा) ही मुलगी शाळेच्या वेळेत कबड्डीचा सराव करत असताना पडून जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कन्या शाळेत शिक्षण घेत असलेली अक्षदा देशमुख ही कबड्डीची खेळाडू आहे. ती दररोज शाळेत कबड्डीच सराव करत होती. परंतु बुधवारी सायंकाळी ही शाळेत कबड्डीचा सराव करत होती. या सरावावेळी ती डोक्यावर पडल्याने तिच्या नकातून रक्त येऊ लागला. हे पाहून इतर विद्यार्थींनीनी तिला धीर देत बाजुला बसवले. डोक्याला मार लागल्याने तिला चक्कर येऊ लागली. विद्यार्थींनीनी ही बाब शिक्षकांना सांगितली. काही वेळात ती बेशुद्ध झाली. हे पाहून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती तिच्या मामा व मामी, काका व काकी, नातेवाईकांना देण्यात आली. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले असून मामा तिचा सांभाळ करत होते.
हलगर्जीपणा बद्दल चौकशी सुरू
कबड्डी खेळताना जखमी झालेली अक्षदाला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले नाही. तिला शाळेत बसवून ठेवत तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक सांगत आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद होऊन पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली..