शालेय विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत ८० लाखांवर डल्ला
माझ्या आजीच्या बँक खात्यात खूप पैसे आहेत…, असे सांगत केले ब्लॅकमेल
सोशलमिडीयावर मैत्री करत ८० लाखांसाठी केले ब्लॅकमेल
गुरुग्राम
हरियाणाच्या गुरूग्राममध्ये फसवणुकीची धक्कादायक घटना घडली आहे. एका दहावीच्या विद्यार्थिनीला एका २० वर्षीय तरुणाने फसवणूक केली. तिच्या आजीच्या खात्यातून तब्बल ८० लाख रुपये लंपास केले आहे. या मुलाने पैसे मिळवण्यासाठी पीडितेला तिचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते. याप्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कटारिया असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने आपल्या शाळेतील एका मित्राला तिच्या आजीच्या खात्यात असलेल्या पैशाबाबात सांगितले होते. त्यामुळे ही बातमी संपूर्ण शाळेत वाऱ्यासारखी पसरली. १० वीच्या एका विद्यार्थ्याने याबाबत आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या काही मित्रांना सांगितले. एवढी मोठी रक्कम एका आजीच्या बॅंक खात्यावर कशी असू शकेल? असे म्हणत यापैकी काहींनी दुर्लक्ष केले.
दरम्यान, सुमित (२०) नावाच्या तरुणाने आणि त्याच्या काही मित्रांनी आजीच्या पैशांवर नजर ठेवली. यासाठी त्यांनी सोशल मी़डियावरून आधी पीडितेसोबत मैत्री केली. यानंतर या आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून तिचे काही फोटो, व्हिडिओ मिळवले. हे फोटो मॉर्फ करून पीडितेचा फोन नंबरही मिळवला. मग हळूहळू त्याने पीडितेला तिचे मॉर्फ फोटो पाठवून पैशांची मागणी केली. जर पैसे दिले नाही, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी त्याने दिली.
पीडित मुलीने दबावाखाली येऊन आजीच्या खात्यातून पैसे पाठवायला सुरुवात केली. आजीला ऑनलाईन खाते वापरणे माहित नसल्यामुळे तिला याबाबत कल्पनाही नव्हती. हे प्रकरण बरेच महिने सुरू होते. पीडितेने पैसे पाठवून आजीच्या खात्यातील जवळपास ८० लाख रुपये आरोपीच्या खात्यावर पाठविले.
या प्रकरणाविषयी पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबियांना सांगितले. तेव्हा पीडितेने सगळी घटना आपल्या घरच्यांना सांगितली. ही घटना २१ डिसेंबर २०२४ ला घडली. घटनेचा अधिक तपास सुरु असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी नवीन कुमार याला गुरुग्राम येथून अटक सोमवारी (दि.३) रोजी अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर, ८० लाखांपैकी पोलिसांना ५ लाख १३ हजार रुपये वसुल करण्यात यश आले.