शाळकरी मुलगा विहीरीत बुडाला
मुक्त सैनिक वसाहत येथील घटना
कोल्हापूर
मुक्त सैनिक वसाहत येथील काटे मळा परिसरातील विहीरीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा शुक्रवारी सायंकाळी बुडाला. पार्थ महेश परीट (वय 13 रा. मुक्त सैनिक वसाहत) असे बुडालेल्या मुलाचे नांव आहे. रात्री उशिरा शोध मोहिम थांबविण्यात आली. शनिवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पार्थ परीट वालावलकर प्रशालेमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी तो मित्रांसोबत मुक्त सैनिक वसाहत येथील काटे मळा येथे असणाऱ्या विहीरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी तो विहीरीमध्ये अचानकपणे बुडू लागला. मित्रांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. याची माहिती मित्रांनी पार्थच्या आईवडीलांना तसेच अग्नीशमन दलास दिली.
अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून शोध मोहिम राबविली. मात्र अंधारामुळे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही शोध मोहिम थांबविण्यात आली. पार्थच्या वडीलांचे इस्त्राrचे दुकान आहे, तर आई घरकाम करते. एकुलता एक मुलगा विहीरीत बुडाल्याने नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदयद्रावक होता. विहीरीमध्ये मुलगा बुडाल्याची माहिती मुक्त सैनिक वसाहत परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती.