Kolhapur News : टीईटी सक्तीविरोधात कोल्हापुरात आज शाळा बंद आंदोलन
टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) सक्ती बिरोधात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी आज शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच शैक्षणिक संघटना सहभागी होऊन १०० टक्के शाळा बंद ठेवणार आहेत. टीईटी सक्तीच्या विरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.
दरम्यान शिक्षण विभागाने एक दिवसाचा पगार कपातीचे परिपत्रक काढले आहे. यापूर्वी १९७७ साली सलग ५४ दिवस शिक्षकांनी संप केला होता. त्यावेळीही पगार कपात केली होती. पण शिक्षकांनी पगार कपातीची तमा न बाळगता न्याय मागणीसाठी आंदोलन यशस्वी केले होते. आताही शिक्षकांनी पगाराची तमा न बाळगताआपले अस्तित्व व शिक्षण वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केले आहे.
जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा मुख्याध्यापक संघ व सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आमदार जयंत आसागावकर नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. दसरा चौक येथून शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. अंशतः खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध आस्थापनाच्या शाळा बंद राहणार आहेत.
शैक्षणिक विरोधातील चुकीचे निर्णय कोल्हापूरने मोठा लढा उभा केला आहे. टीईटी सक्तीचा निर्णय रद्द करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शिक्षण संघटनांनी घेतला आहे.दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयार हजारो शिक्षक धडक देणार आहेत.
या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी हा लढा आहे. सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारला जागे करण्यासाठी शाळा बंद आंदोलनपुकारले असून यामध्ये १०० टक्के शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
शिक्षक नेते प्रभाकर आरडे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यश्न एस. डी. लाड, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यश्न कौस्तुभ गावडे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, सहसचिव श्रीकांत पाटील, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंदकर, शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष विलास चौगले, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत आदी मार्गदर्शन करणार आहेत.