शाळा की कोचिंग क्लासेस
आपल्याला कोणत्या प्रकारची शिक्षणव्यवस्था हवी? याचा निर्णय आता समाजाने घ्यायला हवा. केवळ NEET/JEE मध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी की जीवनात यशस्वी होणारे विद्यार्थी? आपल्याला डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक, प्रशासक आणि व्यावसायिक नक्कीच हवे आहेत. पण त्याचबरोबर आपल्याला संवेदनशील माणसे, जबाबदार नागरिक, चांगले नेते, सर्जनशील कलाकार, खेळाडू, संशोधक आणि समाजासाठी काम करणारी तऊण पिढीही हवी आहे. एक प्रश्नपत्रिका मुलाचे भविष्य ठरवू शकते, पण एक चांगली शाळा त्याचे व्यक्तिमत्त्व घडवू शकते. आज नियमित शाळांच्या अस्तित्वाचा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि शिक्षणाच्या सामाजिक उद्देशाचा प्रश्न आपल्या समोर उभा आहे.
देशभरात पेपरफुटीच्या घटनांवर चर्चा सुरू आहे. पेपर कोणी फोडला? तो कुठून बाहेर गेला? कोणाला आधी मिळाला? किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला? कोण जबाबदार आहे? अशा अनेक प्रश्नांची चर्चा होते. चौकशा होतात, आरोपींवर कारवाई होते, काही जणांना अटक होते आणि काही काळानंतर हा विषय पुन्हा मागे पडतो. परंतु या संपूर्ण प्रश्नाकडे आपण केवळ पेपरफुटी या एका घटनेच्या रूपात पाहणार आहोत का? की त्यामागे निर्माण झालेल्या संपूर्ण शैक्षणिक वातावरणाचा विचार करणार आहोत? परीक्षेतील एका प्रश्नपत्रिकेला एवढे प्रचंड व्यावसायिक महत्त्व प्राप्त होण्यामागे नेमके कारण काय आहे? हा आज सर्वांत महत्त्वाचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे याचे उत्तर शोधताना खासगी Integrated Coaching Classes, शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण, स्पर्धात्मक परीक्षांभोवती निर्माण झालेली बाजारपेठ आणि त्यातून नियमित शाळांच्या भूमिकेवर निर्माण होणारे प्रश्न यांचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. प्रश्न आहे तो कोचिंग शिक्षणाला पूरक राहण्याऐवजी शालेय शिक्षणाचा पर्याय बनण्याचा.
शाळा शिक्षणाचे केंद्र राहणार की फक्त नावापुरती संस्था?
शाळा म्हणजे केवळ पाठ्यापुस्तक शिकविण्याची आणि परीक्षा घेण्याची जागा नव्हे. शाळेत विद्यार्थी शिकतो ज्ञानाबरोबर संवाद, स्पर्धेबरोबर सहकार्य, यशाबरोबर अपयश स्वीकारणे, स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी, अभ्यासाबरोबर खेळ, विज्ञानाबरोबर प्रयोग, कलेबरोबर सर्जनशीलता आणि शिक्षणाबरोबर माणूसपण हे सगळं शिकत असतो. शाळा ही मुलाच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकासाची प्रयोगशाळा असते. परंतुIntegrated Coaching च्या वाढत्या प्रभावामुळे एक वेगळीच परिस्थिती निर्माण होत आहे. काही ठिकाणी शाळा आणि कोचिंग एकाच ठिकाणी चालविले जाते आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वेळापत्रकाचा केंद्रबिंदू NEET, JEE किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षा बनतो. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की आपण मुलांना शिक्षित करीत आहोत की केवळ स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षित करीत आहोत?
तीन विषय म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे
Integrated Coaching पद्धतीत अनेकदा विद्यार्थ्यांचा दिवस प्रामुख्याने काही निवडक विषयांभोवती फिरतो उदा. Physics, Chemistry, Mathematics, Biology. हेच विषय स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे का आहेत? ह्यावर अगोदर पुनर्वीचार करणे गरजेचे आहे. कारण तीन विषय म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे. विद्यार्थ्याला विचार व्यक्त करण्यासाठी भाषा आवश्यक आहे. इतिहास आवश्यक आहे, कारण आपल्या समाजाचा आणि राष्ट्राचा प्रवास समजण्यासाठी इतिहास आवश्यक आहे. समाजशास्त्र आवश्यक आहे कारण माणूस समाजाचा भाग आहे. कला आवश्यक आहे? कारण सर्जनशीलता ही मानवी विकासाची मूलभूत शक्ती आहे. शारीरिक शिक्षण आवश्यक आहे कारण निरोगी शरीरा शिवाय निरोगी मनाची निर्मिती पूर्ण होऊ शकत नाही. मग प्रश्न असा आहे की, स्पर्धात्मक परीक्षेतील यशासाठी इतर सर्व आयामांना दुय्यम ठरवणे योग्य आहे का?
प्रयोगशाळा कुठे आहेत?
विज्ञान हा विषय फक्त पुस्तकात किंवा प्रश्नपत्रिकेत नसतो. विज्ञान म्हणजे प्रयोग, निरीक्षण, प्रश्न, चुका, शोध आणि निष्कर्ष. प्रयोगशाळेत केलेला एक साधा प्रयोग विद्यार्थ्याला अनेक पानांच्या सिद्धांतापेक्षा अधिक शिकवू शकतो. प्रयोग करताना विद्यार्थ्याला अपयश येते. पुन्हा प्रयत्न करावा लागतो. कारण शोधावे लागते. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. परंतु जेव्हा शिक्षणाचा केंद्रबिंदू फक्त स्पर्धात्मक परीक्षेतील प्रश्न सोडविणे बनतो, तेव्हा प्रात्यक्षिके, प्रकल्प, प्रयोग, क्षेत्रभेटी आणि अनुभवाधारित शिक्षण मिळते का? बऱ्याच संस्थामध्ये प्रयोग शाळाच नसतात व मग दुसऱ्या कुठल्यातरी शाळेची प्रयोगशाळा वापरून सगळे प्रयोग एका दमात उरकले जातात. प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रयोग न करता प्रयोगावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाठ करणे ही विज्ञानाची पूर्ण ओळख होऊ शकते का? हा प्रश्न केवळ शिक्षकांनी नव्हे, तर पालकांनी आणि धोरणकर्त्यांनीही विचारण्याची गरज आहे.
सर्वांगीण विकासाला "Extra" का समजायचे?
शाळेतील क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत, नृत्य, वत्तृत्व, वादविवाद, चित्रकला, सामाजिक सेवा, नेतृत्व शिबिरे, विविध स्पर्धा या गोष्टी अनेकदा "Extra-curricular Activities" म्हणून पाहिल्या जातात. पण प्रत्यक्षात त्या Extra नाहीत; त्या शिक्षणाचाच अविभाज्य भाग आहेत. मैदानावर खेळताना विद्यार्थी टीमवर्क शिकतो. नाटक करताना आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती शिकतो. वत्तृत्व करताना विचार मांडण्याची क्षमता विकसित होते. सामाजिक कार्यातून संवेदनशीलता निर्माण होते. नेतृत्वाच्या संधीमधून निर्णयक्षमता विकसित होते. कला विद्यार्थ्याला सर्जनशील बनवते आणि ह्या मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक प्रेरणा जागृत होते व विद्यार्थी नव्या जोमाने अभ्यास करायला लागतो म्हणूनच सर्वांगीण विकास हा शिक्षणाच्या बाहेरचा विषय नसून शिक्षणाचा केंद्रबिंदू असायला हवा.
राष्ट्रीय दिवसांचे महत्त्व व घटनात्मक मूल्ये
शाळा ही राष्ट्रनिर्मितीचीही एक महत्त्वाची संस्था आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन, राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम आणि इतर राष्ट्रीय उपक्रम हे केवळ औपचारिक कार्यक्रम नाहीत. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाच्या कथा ऐकणे, देशभक्तिपर गीत सादर करणे, संविधानातील मूल्ये समजून घेणे, विविध राज्यांच्या संस्कृतींची ओळख करून घेणे, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकत्वाची जाणीव निर्माण होते. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनात अशा उपक्रमांना स्थानच नसेल आणि त्याचा संपूर्ण वेळ केवळ स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीत जात असेल, तर आपण स्वत:ला विचारले पाहिजे उद्याचा डॉक्टर किंवा इंजिनिअर आपण तयार करीत आहोत; पण उद्याचा जबाबदार नागरिक कोण तयार करणार?
NEP 2020 च्या मूळ उद्दिष्टांशी विसंगती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने भारताच्या शिक्षणव्यवस्थेसमोर एक व्यापक आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन ठेवला आहे. त्यामध्ये समग्र शिक्षण, बहुविद्यशास्त्राrय अभ्यास, अनुभवाधारीत शिक्षण, समीक्षात्मक दृष्टी सर्जनशिलात, कला, क्रीडा, जीवन मूल्ये, व्यावसायिक शिक्षण यांना महत्त्व देण्यात आले आहे. शिक्षण केवळ पाठांतरावर आधारित नसावे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमतांचा विकास करणारे असावे, हा या धोरणाचा मूलभूत दृष्टिकोन आहे. मग आपण स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे दिवसभर स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासात गुंतलेल्या विद्यार्थ्याला या सर्वांगीण विकासासाठी वेळ आणि संधी मिळते आहे का? जर विद्यार्थ्याचा बहुतांश वेळ शिकवणी, टेस्ट सिरीज, प्रश्नसंच, सराव परीक्षा आणि रँक सुधारण्यात जात असेल, तर एनईपीचे व्यापक उद्दिष्ट आपण प्रत्यक्षात कितपत साध्य करीत आहोत?
नियंत्रण कोणाचे ?
Coaching Classe चा विस्तार होत असताना त्यांच्या शैक्षणिक कार्यपद्धतीवर प्रभावी नियंत्रण आणि देखरेख कोणाची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शाळा म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांवर संबंधित शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाचे नियम लागू होतात. मात्र जेव्हा शालेय शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षेचे Coaching एकाच व्यवस्थेत चालते, तेव्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची, प्रात्यक्षिक शिक्षणाची, क्रीडा-कला-सांस्कृतिक उपक्रमांची आणि शैक्षणिक गुणवत्तेची एकत्रित जबाबदारी कोण घेत आहे, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यामुळे घ्हा् ण्दम्प्ग्हु व्यवस्थेसाठी पारदर्शक नियमन, नियमित
नियमित शाळांच्या प्रवेशावर परिणाम
या प्रवृत्तीचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे नियमित शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या. आज अनेक पालकांना असे वाटू लागले आहे की, मुलाला NEET किंवा JEE करायचे असेल तरIntegrated Coaching मध्येच प्रवेश घ्यायला हवा. हळूहळू एक धोकादायक मानसिकता तयार होत आहे ‘शाळा प्रमाणपत्रासाठी आणि Coaching यशासाठी.’ जर ही मानसिकता ऊजली, तर नियमित शाळांच्या अस्तित्वासमोरच मोठे आव्हान उभे राहू शकते. कारण नियमित शाळांवर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी असते. त्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा, कला, संस्कृती, प्रयोग, सामाजिक जाणीव, नेतृत्व, जीवनकौशल्ये आणि मूल्यशिक्षणही द्यावे लागते. परंतु जर पालकांचा कल केवळ स्पर्धात्मक निकाल आणि रँकच्या आधारावर संस्थांची निवड करण्याकडे वाढला, तर सर्वांगीण शिक्षण देण्राया नियमित शाळा आणि केवळ परीक्षाकेंद्रित शिक्षण देण्राया संस्था यांच्यातील स्पर्धा असमतोल होऊ शकते.
शिक्षण की शिक्षणाचा व्यवसाय?
या संपूर्ण प्रश्नामागे शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणाचाही विचार करावा लागेल. स्पर्धा वाढते. पालकांची चिंता वाढते. मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याची इच्छा वाढते. त्यातून Coaching ची मागणी वाढते. मागणी वाढली की त्याभोवती मोठी व्यावसायिक बाजारपेठ तयार होते. मग अनेक पालक त्यांना शक्य नसतानाही कर्ज काढून प्रवेश मिळवण्याची धडपड करतात आणि मग तयार होते एक चक्र (स्पर्धा ? पालकांची चिंता ? Coaching ? अधिक स्पर्धा ? अधिक Coaching ? अधिक व्यावसायिकीकरण. ) या चक्राच्या मध्यभागी कोण आहे हे समजून घेतले पाहिजे. लक्षणांवर उपचार करण्याऐवजी रोगाच्या मुळाशी जाण्याची वेळ आली आहे. एक गोष्ट निश्चित आहे ज्या परीक्षेला प्रचंड व्यावसायिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होते, तिथे गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्ती निर्माण होण्याचा धोका वाढतो.
प्राचार्य दीपक शंकर आमोणकर,
डॉ. केशव बळीराम हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालय