For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोंडार परिसरात मुग्धबलाक पक्षांची शाळा

05:52 PM Mar 07, 2025 IST | Radhika Patil
कोंडार परिसरात मुग्धबलाक पक्षांची शाळा
Advertisement

 भिलवडी :

Advertisement

उघड्या चोचीचा करकोचा व मुग्धबलाक या नावांनी ओळखले जाणाऱ्या करकोच्यांनी यंदा पलूस तालुक्यातील आमणापूरच्या कोंडार परिसरात मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. परदेशी पाहुण्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या आमणापूरच्या कोंडार परिसरात एकाचवेळी तब्बल वीस मुग्धबलाक पक्षांची नोंद झाल्याची माहिती येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे.

गतवर्षी पाऊसकाळ लांबल्याने तसेच नदीची पाणीपातळी जास्त राहिल्याने उथळ पाण्याअभावी हिवाळ्यात पाहुणे पक्षी आमणापूर कृष्णाकाठावर रूसल्याचे पहायला मिळाले. आता नदीची पाणीपातळी कमी होताच याठिकाणी पक्षांची शाळा भरू लागली आहे. मात्र यामध्ये नदी प्रदुषणाचे संकेत देणारे पक्षी अधिक आहेत. यामध्ये आज मुग्धबलाकच्या थव्याची भर पडल्याचे पहायला मिळाले.

Advertisement

'अनास्टोमस आस्किटन्स' या शास्त्रीय व इंग्रजित 'ओपनबिल स्टॉर्क' या नावाने ओळखले जाणारे हे करकोचे पाण्यापासून सध्या मुक्त झालेल्या हिरवळीवर खाद्य मटकावत पाण्याच्या काठावर चरताना दिवसभर नजरेस आहेत. पडत राखी बगळ्या पेक्षा थोडासा लहान आकार असलेला हा पाणपक्षी पाणथळावर चित्रबलाक, चमचेचोच, पांढरे कुदळे, पाणकावळे इत्यादी पक्ष्यांसमावेत भागीदारी करत खाद्य निवडताना आढळतात. या पक्ष्यांची उंची सामान्यपणे अडीच फुटांपर्यंत असते लांबून हा पक्षी श्वेतबलाक (व्हाइट स्टॉर्क) सारखाच दिसतो. शरीराचा रंग करडा असतो व पंख काळे असतात. मान पांढरी असते. शेपटी आतून व दोन्ही बाजूने दबल्यामुळे चपटी झालेली असते व ती काळी रंगाची असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. गोगलगायी, शंख शिंपले, खेकडे हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून ते मासे, बेडूक, चिखलातील मोठे किडे इतर संधिपाद प्राण्यांवरही उदरनिर्वाह करतात. त्यांच्या चोचीत कमानाकाराची फट असल्यामुळे हे पक्षी शंख शिंपल्यांच्या अंगावरील कठिण कवच फोडून आतील लुसलुशीत मांस खातात. दोन्ही चोच मिटल्यानंतर वरच्या आणि खालच्या चोचीमध्ये चंद्रकोरीच्या आकाराची फट दिसते. यावरून या पक्ष्यांना तोंडफट्या, उघड्या तोंडाचा करकोचा या नावाने ओळखतात.

भौगोलिक परिस्थिततीला अनुसरून हे पक्षी देशातील विविध भागात विणीवर जाणाऱ्या या पक्ष्यांमध्ये आवाजाचा कंठ नाही. त्यामुळे यांना मुग्धबलाक हे नाव दिले आहे. एरवी मुके असलेले हे करकोचे फक्त विणीच्या काळात एकमेकांना साद घालताना नरमादी दोन्ही आपल्या चोचीचा भाग एकमेकांवर आपटून आवाज काढतात. मिलन काळात मादीच्या घशातून गुरगुर आवाज निघतो तर नर पक्षी या काळात चोचीच्या उघडझाप करत कटकट असा आवाज काढून मादीशी संवाद साधतो.

Advertisement
Tags :

.