शाळेपासून ओळख...चॅटिंग पाठविण्याची धमकी देत तिला व्हिडीओ पाठविण्यास भाग पडले, लॉजवर नेत शारीरिक अत्याचार; शेवटी तिच्या आई-वडिलांच्या व्हॉट्सॲपवर......
बार्शी: प्रेमसंबंध स्वीकारण्यासाठी दबाव टाकत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीचा लैंगिक छळ करून शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप बार्शीतील एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध करण्यात आला आहे. संबंधित तरुणाने तरुणीच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर तिचे व्हिडीओ पाठविल्याची फिर्याद पीडित तरुणीने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली असून तरूणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी आरोपीला तत्काळ अटक करून बार्शीतील न्यायालयासमोर उभे केले असता, पुढील तपासासाठी आरोपीस सोमवार दि. २ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संबंधित तरुण आणि पीडिता हे शाळेपासून ओळखत आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये महाविद्यालयाच्या परिसरात आरोपीने प्रेमसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तरुणीने त्यास नकार दिल्यानंतरही आरोपी फोन, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधून भेटण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर चॅटिंग पालकांना पाठविण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीला तिचे व्हिडीओ पाठविण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने तिला कोल्हापुरातील एका लॉजवर नेत शारीरिक अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
२७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपीने तरुणीच्या वडिलांना फोन करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपीने व्हॉट्सॲपद्वारे तरुणीचे व्हिडीओ तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
