Ichalkaranji News | घरात कोणालाही न सांगता नदीवर गेले आणि काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं!
पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय आर्यनचा दुर्दैवी अंत,
इचलकरंजी : नातेवाईकांच्या मुलांसहपंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. आर्यन अनिल मसरंग (वय १४, रा. तेलगू सोसायटी, सोलगे मळा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व परिसरातून मिळालेली माहिती अशी, आर्यन हा नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश घेणार होता. सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने तो त्याचा चुलत भाऊ यश आणि आणखी एका नातेवाईकासह घरात कोणालाही न सांगता दुपारी पंचगंगा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्रात त्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक पोहत होते.
मात्र, आर्यनला व्यवस्थित पोहता येत नसतानाही त्याने नदीतसुळकी मारली. काही क्षणांनंतर तो पाण्याबाहेर न आल्याने त्याचा चुलत भाऊ यशने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर आर्यन नदीपात्रातील गाळात रुतल्याचे दिसून आले. उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून तातडीने येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी नदीकाठ तसेच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. याबाबतची नोंद घेण्याचे काम पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.