For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निगुडे शाळेतील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकांची भेट

निगुडे शाळेतील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकांची भेट
Advertisement

न्हावेली /वार्ताहर : न्हावेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ चे माजी विद्यार्थी श्री. गजानन नरसुले यांनी दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी शाळेतील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे दहा हजार रुपये किमतीची मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून दिली. गजानन नरसुले हे गेली अखंड २५ वर्षे निगुडे गावातील शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सुलभ व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने ते सातत्याने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत.
यापूर्वीही त्यांनी निगुडे शाळा क्रमांक १ साठी प्रोजेक्टर संच तसेच वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी केलेल्या या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास निगुडे गावचे माजी सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. समीर गावडे, उपसरपंच श्री. गौतम जाधव, श्री. संतोष राणे, श्रीमती भाग्यश्री जाधव, श्री. आप्पा गावडे, श्रीमती नेहा पोखरे, श्री. सुधीर नाईक, सौ. विमल जाधव, मुख्याध्यापक श्री. नारायण नाईक, शिक्षक श्री. प्रशांत कांदे, श्री. हेमंत सावंत, श्रीमती प्रांजल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. गजानन नरसुले यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी निश्चितच मोठी मदत होणार असून, त्यांचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.