वस्तू उत्पादनाला पाठबळ देण्याची योजना
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा महत्वपूर्ण उपक्रम, ‘प्रवृद्धी’च्या माध्यमातून प्रयत्न होणार
वृत्तसंस्था / बेंगळूर
भारतात वस्तू उत्पादनाला पाठबळ देणे आणि भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करणे, यासाठी बेंगळूरची जागतिक ख्यातीची संशोधन आणि शिक्षण संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने एक योजना सज्ज केली आहे. प्रवृद्धी या नावाने ही योजना ओळखली जात असून या योजनेमुळे भारतातील मध्यम आणि लघु उद्योगांचा लाभ होऊ शकतो, असे या संस्थेचे म्हणणे आहे.
अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांचा वाटा भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात साधारणत: 30 टक्के वाटा आहे. तसेच देशातील 23 कोटी लोकांना या उद्योगांनी रोजगार दिला आहे. कृषी क्षेत्राच्या पाठोपाठ रोजगार निर्मितीत याच क्षेत्राचे योगदान आहे. या क्षेत्राची प्रगती समाधानकारक असली, तरी या क्षेत्राला लागणाऱ्या भांडवली वस्तूंसाठी भारताला वाढत्या प्रमाणात आयातीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे या क्षेत्राच्या प्रगतीचा संपूर्ण लाभ देशाला मिळत नाही. आयातीवरचे अवलंबित्व शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. आपल्या उत्पादन क्षेत्रातील ही त्रुटी लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्याची योजना बनविण्यात आली असल्याचे या संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रवृद्धीचे महत्व
प्रवृद्धी ही योजना यासाठी साकारण्यात आली असून ती उत्पादन प्रोत्साहक म्हणून काम करणार आहे. अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये नव्या नव्या वस्तू निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे, वस्तूंची गुणवत्ता वाढविण्यासाठी साहाय्य करणे आणि वस्तूंची सुबकता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे, हे या योजनेचे ध्येय आहे. आज ज्या वस्तूंची आयात केली जात आहे, त्यांच्यापैकी अनेक वस्तू भारतातच निर्माण होणे शक्य आहे. तसेच या वस्तू निर्माण करण्यासाठी जी यंत्रसामग्री किंवा साधनसामग्री लागते, तीही भारतातच निर्माण करता येणेही शक्य आहे. त्यामुळे तसा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमात यश असल्यास आयातीच्या माध्यमातून भारतातून बाहेर जाणारा बराचसा पैसा वाचू शकेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे देशातला पैसा देशातच राहून तो देशावासियांनाच मिळू शकतो. या उद्योग क्षेत्रातून निर्माण झालेल्या वस्तूंना विदेशातही मागणी मिळू शकते, ज्यामुळे भारताची निर्यात वाढू शकते. त्यामुळे प्रवृद्धी योजना अनेक दृष्टींनी महत्वाची आहे.
भांडवली वस्तू क्षेत्र महत्वाचे
छोट्या मोठ्या वस्तू निर्माण करण्यासाठी जी यंत्रसामग्री लागते तिला भांडवली वस्तू असे म्हणतात. या वस्तूंचे 10 विभाग आहेत. अवजड वीज यंत्रे, वस्त्रोद्योग, मुद्रण व्यवसाय इत्यादी क्षेत्रांमध्ये या भांडवली वस्तूंसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. प्रत्येक वर्षी भारताला अशा दीड लाख कोटी रुपये किमतीच्या वस्तूंची आयात करावी लागते. यामुळे देशाचा पैसा मोठ्या प्रमाणात देशाबाहेर जातो. या वस्तूंचे उत्पादन भारतातच केल्यास तेव्हढा देशाचा पैसा वाचू शकतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अशा वस्तूचे तंत्रज्ञान विकसीत केले जाईल आणि या वस्तू भारतातच निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.