दरड कोसळून 10-15 जण ढिगाऱ्याखाली
अंकोला तालुक्यातील शिरूर येथील दुर्घटना : एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश : चार जणांचे मृतदेह सापडले
कारवार : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळूर दरम्यानचा राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 व अंकोला तालुक्यातील शिरुर येथील बोमय्या देवस्थानजवळ महाकाय आकाराची दरड कोसळल्याने 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भयावह घटना घडली आहे. त्यातील चार जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. घटनास्थळी ढिगारे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. धुवाधार पावसामुळे कारवार जिल्ह्यातील राष्ट्रीय हमरस्तासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरड कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्थेची दैना उडाली आहे.
या दुर्घटनेतील लक्ष्मण नाईक, शांती नाईक, रोशन नाईक व एका अज्ञाताचा मृतदेह सापडला आहे. ढिगारे हटविण्याचे काम रात्री उशिरा थांबविण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत. शिरुर येथील बोमय्या देवस्थानजवळ दरड कोसळल्याने 10 ते 15 जण गाडले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन ते तीन घरे आणि हमरस्त्यावरुन ये-जा करणारी वाहने गाडली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अरुण द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली 28 जवान असलेले एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहेत. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटविण्यासाठी त्यांचे परिश्रम सुरू झाले आहेत. कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी शिरुर दुर्घटनेत सातजण बेपत्ता झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी विधानसभेत बोलताना शिरुर दुर्घटनेत 10 ते 15 नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे. एकाच कुटुंबातील पाच जण ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. त्यांची नावे किसन नाईक (47), शांती नाईक (36), रोशन (वय 11), अवंतिका (वय 6) आणि जगन्नाथ (वय 55) अशी आहेत.
दोन टँकर गंगावळी नदीत वाहून गेले
शिरुर येथील दरड कोसळल्यानंतर गॅस/पेट्रोलची वाहतूक करणारे टँकर वाहून गेल्याची माहिती कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी दिली आहे. शिरुर येथे गंगावळी नदी राष्ट्रीय हमरस्त्याला समांतर वाहते. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरुन जाणारे टँकर मातीच्या ढिगाऱ्यामुळे नदीत ढकलेले गेले की रस्त्यावर थांबलेले टँकर नदीत ढकलले गेले, हे समजायला मार्ग नाही. वाहून गेलेल्या टँकरमध्ये चालक, क्लिनरसह अन्य कोण होते की काय हेही समजले नाही. टँकरमधील गॅस/पेट्रोलची गळतीचा धोका लक्षात घेऊन नदीच्या काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. शिरुर येथील दुर्घटनेनंतर एक कारही वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याला जिल्हा प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. गंगावळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने टँकर नदीबाहेर कसे काढले जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कारवार तालुक्यात घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू
कारवार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे किन्नर येथील निराकार देवस्थानाजवळील तर्कीस गुरव यांच्या घरावर मंगळवारी सकाळी दरड कोसळली. दरड कोसळल्याने गुरव यांचे घर उद्ध्वस्त झाले आणि गुरव मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडून ठार झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढला. या घटनेची नोंद कारवार ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यावरील वाहतूक ठप्प
आजमितीला जिल्ह्याचे वर्णन करायचे झाल्यास पाऊस, पाऊस, पाणी, पाणी आणि पाणी असे करावे लागेल. त्यामुळे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने आणि अनेक रस्त्यांवर दरड कोसळल्याने वाहतुकीची मोठी दैना उडाली आहे. कारवार-इलकल रस्त्यावरील मंद्रोळी येथे दरड कोसळल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. कारवार-अंकोला राष्ट्रीय हमरस्त्यावर चंडीया, अरगा येथे प्रचंड पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिरसी-कुमठा रस्त्यावरील देवीमने घाटात दरड कोसळल्याने या मार्गावर ही वाहतूक ठप्प झाली आहे. अंकोला-यल्लापूर हमरस्ता पाण्याखाली गेला आहे. होन्नावर-बेंगळूर रस्त्यावर मंगळवारी पाचव्यांदा दरड कोसळली आहे. शिरसी-कुमठा रस्ता कथगाल येथे पाण्याखाली गेले आहे.
गंगावळी, अघनाशिनी नद्यांनी पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली
शिरसी, यल्लापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा किनारपट्टीवरुन वाहणाऱ्या गंगावळी, अघनाशिनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1224 मिमी तर सरासरी 102 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची नोंद अशी (आकडेवारी मिमी मध्ये)-अंकोला 179, भटकळ 150, हल्याळ 12.3, होन्नावर 165, कारवार 159, कुमठा 171, मुंदगोड 32, सिद्धापूर 154, शिरसी 121, सुपा 50, यल्लापूर 44 आणि दांडेली 17.
लोकप्रतिनिधींची दुर्घटनास्थळी भेट
कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे, कारवारचे आमदार सतीश सैल, जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया, जिल्हा पंचायत सीईओ ईश्वर कांदू, जिल्हा पोलीस प्रमुख मंजुनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रु.
कारवार जिल्ह्यातील शिरुरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आठवडाभरात पावसाचा जोर वाढला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 मध्ये अंकोलानजीक डोंगर पोखरुन रस्ता तयार करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पाऊस होत असल्याने दरड कोसळली आहे. बचावकार्य हाती घेण्यात आले असून मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.