For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच कोटींच्या व्यवहाराचा सीआयडीला संशय

06:32 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाच कोटींच्या व्यवहाराचा सीआयडीला संशय
Advertisement

केपीएससी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीत घोटाळा : आणखी आरोपींच्या अटकेची शक्यता

Advertisement

त. भा./ प्रतिनिधी

कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) चौकशी सुरू असून प्राथमिक तपासात तब्बल पाच कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तसेच 85 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे सीआयडी तपासात आढळले आहे.

Advertisement

या प्रकरणात आतापर्यंत 273 जणांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान 15 उमेदवारांसह काही आरोपींनी आपली भूमिका मान्य केल्याचे तपास अधिक्रायांकडून समोर आले आहे. तपासात बहुतांश व्यवहार रोख स्वरूपात झाल्याचे आढळून आले आहे. बिदर सौहार्द बँकेच्या व्यवस्थापकाची चौकशी करण्यात आली असून कन्नाळे यांच्यासोबत झालेल्या व्यवहाराबाबत त्यांनी माहिती दिल्याचे समोर आले आहे.    दरम्यान, चौकशीसाठी उपस्थित न राहिलेल्या शांत होसमणी यांना पुन्हा नोटीस बजावण्याची तयारी सीआयडीकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका युवतीकडून 23 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी बसवराज कन्नाळे यांच्या सहक्रायांचाही सीआयडीकडून शोध सुरू असून, तपास पुढे जात असताना या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शांत  होसमणी यांच्याभोवतीही संशयाचे वर्तुळ

केपीएससीच्या तीन भरती प्रक्रियांमध्ये शांत होसमणी यांच्याकडून कथित चुका झाल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. आरडब्लूडी विभागातील एइइ भरतीतील कथित गैरप्रकारातही शांत होसमणी यांचे नाव चर्चेत आले होते.

2023 मध्ये एइइ भरतीतील कथित गैरप्रकाराच्या चौकशीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, समितीच्या काही सदस्यांना माहिती न देता निवड यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. तत्कालीन सचिव लता कुमारी यांच्या माध्यमातून निवड यादी प्रसिद्ध करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याने यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही. यानंतर शांत होसमणी यांना उपसमितीतून बाजूला करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे केपीएससी भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकाराच्या तपासाला आता अधिक वेग आला असून सीआयडीच्या पुढील तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.