‘एसबीआय फंडस’चा समभाग आज होणार सुचीबद्ध
नवी दिल्ली
एसबीआय फंडस् मॅनेजमेंट यांचा समभाग शेअरबाजारात मंगळवार 21 जुलै रोची सुचीबद्ध होणार आहे. या समभागाकडे तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी मागच्या आठवड्यात चांगला प्रतिसाद नोंदवला आहे. 20 जुलै रोजी आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 103 रुपयांवर होता. याआधारे पाहता समभाग 677 रुपयांवर उघडू शकतो, असा तज्ञांचा होरा आहे. 574 इशु किमतीपेक्षा 18 टक्के वाढ दर्शवते आहे.
कसा होता प्रतिसाद
सदरच्या आयपीओला चांगला प्रतिसाद प्राप्त झाला. हा इशु जवळपास 41.73 टक्के इतका सबस्क्राइब झाला. पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 140 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 22 पट व रिटेल गटाने 3.76 पट आयपीओ सबस्क्राइब केला आहे. 11693 कोटी रुपयांची उभारणी या आयपीओतून होणार आहे. आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असेल. याआयपीओतून उभारलेली रक्कम कंपनीला मिळणार नाही तर आपली हिस्सेदारी विक्री करणाऱ्या सध्याच्या समभागधारकांना ती मिळेल.
कोणी विकली हिस्सेदारी
या आयपीओत एसबीआयने आपली 6.3 टक्के हिस्सेदारी विक्री केली. अमुंडी इंडिया होल्डिंग्जने 3.7 टक्के हिस्सेदारी विकली आहे. आयपीओ खुला होण्याआधी कंपनीने 2663 कोटी रुपयांची उभारणी केली होती. यात सिंगापूर सरकार, अबूधाबी इन्वेस्टमेंट ऑथोरिटी, नॉर्वेची सॉवरेन वेल्थ फंड, ब्लॅकरॉक, एलआयसी व इतर देशांतर्गत म्युच्युअल फंडस यांनी गुंतवणूक केली आहे. 16.32 लाख कोटी रुपयांसह एसबीआय फंडस मॅनेजमेंट ही देशातील सर्वाधिक मोठी म्युच्युअल फंड कंपनी ठरली आहे.