Sangli Crime | इथे मावा खाऊ नको" म्हणणं पडलं महागात! सांगलीत रखवालदारावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
सांगलीत रखवालदारावर जीवघेणा हल्ला
सांगली : सांगलीत संतापजनकप्रकार उघडकीस आला असून, किरकोळ कारणावरून एका रखवालदाराबर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात मावा खाण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून तिसऱ्याच दिवशी संशयिताने पाठलाग करत लोखंडी रॉडने वार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उषःकाल हॉस्पिटलमध्ये रखवालदार म्हणून काम करणारा सुहेल बाबानगर याने बुधवारी दुपारी रुग्णालय परिसरात मावा खात बसलेल्या हर्षद खरात याला विरोध केला होता. "इथे मावा खाऊ नको" एवढे सांगितल्यावरूनच बाद पेटला. याच वेळी संशयिताने शिवीगाळ करत उर्मटपणे प्रत्युत्तर दिले.
घटनेचा राग मनात ठेवत दुसऱ्याच दिवशी पुन्हा सुहेलला धमक्या देण्यात आल्या तुला मारल्याशिवाय सोडणार नाही," अशी उघड धमकी देण्यात आली. आणि अखेर शुक्रवारी दुपारी हा वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात परिवर्तित झाला.
नेहमीप्रमाणे काम संपवून घरी निघालेल्या सुहेलचा संशयिताने पाठलाग केला. शंभर फुटी रस्त्यावरील क्रिकेट टर्फजबळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने अचानक लोखंडी रॉडने सुहेलच्या कानावर जबर फटका मारला. जोरदार वारामुळे सुहेल दुचाकीसह खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी सुहेलला रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.