For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कर्जत-भीमाशंकरमध्ये एकही झाड तोडू देणार नाही! अभिनेते सयाजी शिंदे टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाविरोधात आक्रमक

05:11 PM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्जत भीमाशंकरमध्ये एकही झाड तोडू देणार नाही  अभिनेते सयाजी शिंदे टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाविरोधात आक्रमक
Advertisement
मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे भिमाशंकर अभयारण्याच्या परिसरालगत प्रस्तावित असलेल्या टोरेंट कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पावरून पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनीही या वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका मांडत, “कर्जत-भीमाशंकर परिसरात यापुढे एकही झाड तोडू देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.

विकासाच्या नावाखाली जंगलांचा विनाश नको

प्रकल्पासाठी आतापर्यंत हजारो झाडे तोडण्यात आल्याचा दावा करत पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सह्याद्रीचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत सयाजी शिंदे यांनी जंगलतोडीमुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे मत मांडले.

Advertisement

“सह्याद्री हे जगातील एक मोठे आश्चर्य आहे. पशू-पक्ष्यांची घरे उद्ध्वस्त करून आपण नेमके काय साध्य करतो आहोत? विकासाच्या नावाखाली जमिनी घेतल्या आणि जंगलांचा नाश केला, तर पुढच्या पिढ्यांचे भविष्य धोक्यात येईल,” अशा शब्दांत त्यांनी प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या वृक्षतोडीवर टीका केली.

‘एकही झाड न तोडता प्रकल्प करा’

ऊर्जा प्रकल्पाला आपला विरोध नसून, त्यासाठी झाडांची कत्तल करण्याला विरोध असल्याचे सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. “एकही झाड न तोडता हा प्रकल्प उभारावा. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू राहिली, तर पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

Advertisement

जगातील जंगलांचे प्रमाण वाढवण्याची गरज असताना उपलब्ध जंगलांवर घाला घातला जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जगात सध्या सुमारे 18 टक्के जंगलक्षेत्र शिल्लक असून ते 33 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची गरज आहे.

वृक्षतोडीविरोधात जनआंदोलनाचे आवाहन

वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहनही सयाजी शिंदे यांनी केले. झाडे तोडण्यासाठी कोणी आल्यास हातात ताटे-वाट्या घेऊन आवाज करत त्यांना विरोध करा, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ कार्यकर्त्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, कर्जत आणि भिमाशंकर परिसरातील प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा तीव्र झाली आहे. प्रकल्पाच्या विकासासोबतच जंगल, जैवविविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण कसे साधता येईल, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरणवाद्यांचा विरोध आणि प्रकल्पाबाबतची भूमिका यामुळे आगामी काळात हा मुद्दा अधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.