सावंतवाडीचा पाणीपुरवठा सुरळीत; पाळणेकोंड धरणात 0.73 एमसीएम साठा; मुख्याधिकारी विनायक औंधकर
सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणात समाधानकारक पाणीसाठा असून डोंगरातील झरेही सुरू आहेत. त्यामुळे शहरावर सध्या पाणीटंचाईचा कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
सावंतवाडी शहराला पाळणेकोंड धरण आणि केसरी झऱ्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना गुरुत्वाकर्षणावर आधारित असून शहरातील विविध वॉर्डमध्ये सकाळी व संध्याकाळी विभागून नियमित पाणीपुरवठा सुरू आहे.
यंदाच्या पावसाळ्यात 11 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3.30 वाजता पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो झाले होते. याची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंदवहीत केली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तळाशी साचलेला गाळ, माती व इतर अशुद्धता बाहेर काढण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी मेन वॉशआऊट व्हॉल्व्ह नियोजित पद्धतीने सोडण्यात आला. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी व्हॉल्व्ह बंद करण्यात आला.
पाळणेकोंड धरणाची एकूण साठवण क्षमता 0.76 एमसीएम (18 मीटर) असून सध्या 0.73 एमसीएम (16 मीटर) पाणीसाठा शिल्लक आहे. मागील काही वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा सुमारे ०.०३ एमसीएम (२ मीटर) पाणीसाठा कमी आहे.
दरम्यान, डोंगराळ भागातून धरणात येणारे पावसाचे झरे अद्याप सुरू असून केसरी झऱ्यातूनही पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुरू असून पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवणार नसल्याचे मुख्याधिकारी औंधकर यांनी स्पष्ट केले.