सावंतवाडीच्या पाणीप्रश्नासाठी निर्णायक पाऊल उचला; मसुरकरांचे पालकमंत्र्यांना निवेदन
ओटवणे : सावंतवाडी शहर आणि ग्रामीण भागातील भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी चराठा-ओटवणे-कारिवडे सीमेवरील प्रलंबित धरण प्रकल्पाला तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी नगरपालिका हद्दीसह माजगाव, मळगाव, चराठा, कोलगाव, केसरी आदी भागांनाही या परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या या भागाला कुणकेरी आणि केसरी धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दोन्ही धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चार किलोमीटर अंतरावर प्रस्तावित धरण
सावंतवाडी शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर चराठा-ओटवणे-कारिवडे गावांच्या सीमेवर नवीन धरण उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वी शासनाच्या विचाराधीन होता. या प्रकल्पासाठी संबंधित जमीनमालकांना शासनाकडून मोबदला देऊन धरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे.
हे धरण पूर्ण झाल्यास सावंतवाडी शहराबरोबरच लगतच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच भविष्यात नागरिकांना अधिक नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
विशेष निधीची मागणी
प्रलंबित धरण प्रकल्पासाठी पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि अर्थ विभागामार्फत विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. केवळ सध्याची पाणीटंचाई दूर करण्याऐवजी पुढील अनेक वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मसुरकर यांनी नमूद केले.
सावंतवाडी शहर आणि ग्रामीण भागाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाणी गरजांसाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही करावी आणि पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे.