प्रश्नांनी गुदमरला सावंतवाडी तालुका ; अधिकारी निरुत्तर
आमदारांची आमसभा घेण्याची पंचायत समिती सदस्यांची आर्त हाक
सावंतवाडी : प्रतिनिधी
तालुक्यातील विविध विभागांच्या प्रलंबित प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले असून अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. या समस्यांबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने जनतेच्या प्रश्नांचे निराकरण होत नसल्याची तीव्र खंत सावंतवाडी पंचायत समितीच्या सभेत व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदारांची तातडीने आमसभा आयोजित करून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणावे आणि तालुक्यातील प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावावा, अशी आर्त मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली.
सावंतवाडी पंचायत समितीच्या सभेत विविध विकासकामे, प्रलंबित योजना आणि नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेतला जात असताना आमसभेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. अनेक सदस्यांनी तालुक्यातील विविध विभागांशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. मात्र या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांकडून अपेक्षित माहिती मिळत नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. यामुळे जनतेच्या समस्या कायम राहतात आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो, असे सदस्यांनी नमूद केले.
उपसभापती गौरव मुळीक यांनी या विषयावर बोलताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तालुक्यात शेवटची आमसभा नेमकी कधी झाली, याची माहितीही अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयाचा अभाव दर्शवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील विविध प्रश्नांवर सर्वंकष चर्चा होण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना थेट जबाबदार आमदारांची आमसभा घेण्याची पंचायत समिती सदस्यांची आर्त हाक" आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आमसभा तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“तालुक्यातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन आणि इतर अनेक विभागांचे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. मात्र संबंधित विभागांकडून योग्य माहिती मिळत नाही. अनेकदा विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने प्रश्न प्रलंबित राहतात. अशा परिस्थितीत आमसभा हाच प्रभावी मार्ग ठरू शकतो,” असे मत मुळीक यांनी व्यक्त केले.यावेळी सभापती सुश्मिता जाधव यांनी आमसभेबाबत प्रशासन स्तरावर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. आमसभा घेण्याबाबतची टिप्पणी ठेवण्यात आली असून आमदार दीपक केसरकर यांच्याकडून वेळ आणि तारीख निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आमसभा आयोजित करण्याबाबत पंचायत समिती सकारात्मक असून योग्य वेळी ती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनीही आमसभेची गरज अधोरेखित केली. “तालुक्यातील अनेक प्रश्न केवळ विभागीय बैठकीतून सुटणारे नाहीत. आमसभा झाल्यास सर्व विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकाच ठिकाणी उपस्थित राहतील. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर थेट चर्चा होईल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तरे मिळतील. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणाला गती मिळू शकते,” असे त्यांनी सांगितले.
गावकर यांनी पुढे सांगितले की, अनेक वेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा इतर बैठकीत प्रश्न मांडले जातात; मात्र त्यावर ठोस निर्णय होत नाहीत. आमसभेत मात्र प्रत्येक विभागाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागते. त्यामुळे नागरिकांनाही प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्याची संधी मिळते. यासाठी आमसभा नियमितपणे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुस्कर यांनीदेखील आमसभेची मागणी करत तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक समस्या अद्याप कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्या सोडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून त्यासाठी आमसभा हा प्रभावी मंच ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभेत उपस्थित इतर सदस्यांनीही याच भूमिकेचे समर्थन केले. नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्षात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. विविध विभागांतील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आमसभेत उपस्थित राहावे लागेल. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून त्यावर तातडीने निर्णय होण्याची शक्यता निर्माण होईल, असे सदस्यांनी सांगितले.
दरम्यान, आमसभेच्या मागणीमुळे तालुक्यातील विविध प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विकासकामांतील विलंब, मूलभूत सुविधांची कमतरता, विभागीय समन्वयाचा अभाव आणि माहिती देण्यातील टाळाटाळ या मुद्द्यांवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रशासन आणि आमदार कार्यालयाकडून कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.तालुक्यातील प्रश्नांच्या निराकरणासाठी आमसभा हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करत पंचायत समिती सदस्यांनी लवकरात लवकर तारीख निश्चित करून आमसभा आयोजित करण्याची जोरदार मागणी केली आहे. आता आमदार दीपक केसरकर यांच्याकडून तारीख निश्चित झाल्यानंतर या मागणीवर पुढील कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट झालेआहे.