For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी तालुक्यात 10 ऑक्टोबरपर्यंत दीड हजारांहून अधिक बंधारे उभारणार; नेमळे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते शुभारंभ

04:41 PM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी तालुक्यात 10 ऑक्टोबरपर्यंत दीड हजारांहून अधिक बंधारे उभारणार  नेमळे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते शुभारंभ
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी सावंतवाडी तालुक्यात 10 ऑक्टोबरपर्यंत दीड हजारांहून अधिक कच्चे व मातीचे बंधारे उभारण्याचा संकल्प पंचायत समितीने केला आहे. या मोहिमेचा शुभारंभ नेमळे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

तालुक्यातील गावागावांत तसेच वाड्यावाड्यांत नदी, ओहोळ आणि नाल्यांवर हे बंधारे उभारण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदी-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

पंचायत समिती सभापती सौ. सुष्मिता जाधव यांनी सांगितले की, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांनी आपल्या गावात किमान 50 ते 100 बंधारे उभारण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही गावागावांत बंधारे उभारून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले. नेमळे येथून सुरू झालेली ही मोहीम आता संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जलसंधारण विभागाचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.