For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सालईवाडा तहसीलदार कार्यालय परिसरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली; इमारतधारकांना नोटिसा; सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याची तक्रार; दोषींवर कारवाईचे अधिकारी वैभव अंधारी यांचे निर्देश

05:31 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सालईवाडा तहसीलदार कार्यालय परिसरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली  इमारतधारकांना नोटिसा  सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याची तक्रार  दोषींवर कारवाईचे अधिकारी वैभव अंधारी यांचे निर्देश
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा तहसीलदार कार्यालय परिसरातील इमारतींची सांडपाणी निचरा व्यवस्था बिघडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सांडपाण्याच्या पाइपलाइनमधून गळती होऊन हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याने गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Advertisement

या समस्येची दखल घेत नगरपरिषदेचे अधिकारी वैभव अंधारी यांनी आरोग्य विभागाला परिसरातील इमारतींच्या सांडपाणी व्यवस्थेची तपासणी करून संबंधित इमारतधारकांना नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस देऊनही आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या इमारतधारकांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

STP आणि सोकपिटची तपासणी

तहसीलदार कार्यालय परिसरातील इमारतींमध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा म्हणजेच STP किंवा Soak Pit उपलब्ध आहे की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या इमारतींमध्ये आवश्यक व्यवस्था नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यासोबतच सांडपाणी व्यवस्थेबाबत त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती घेण्यासही सांगण्यात आले आहे.

Advertisement

सांडपाण्याच्या पाइपलाइनची स्थिती तपासून ती पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला जोडलेली असल्यास ती तातडीने हटवावी, असेही अधिकारी अंधारी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस शिष्टमंडळाची पालिका अधिकाऱ्यांकडे धाव

या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने सालईवाडा भागातील काँग्रेसचे शिष्टमंडळ तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकाऱ्यांना भेटले. सामाजिक कार्यकर्ते आनंद आयरे, सागर देसाई, इनास मटकर आणि उमेश परब यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत परिसरातील सांडपाणी आणि दूषित पाण्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आरोग्य विभागाकडून नोटिसांची कार्यवाही

आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांनी शहरातील इमारतधारकांकडून सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थेबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या नोटिसा बजावण्यात येतील, असे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते आनंद आयरे यांनी तहसीलदार कार्यालय परिसरात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी नगरसेविका दुलारी रांगणेकर, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कांबळे तसेच आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

.