For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी रोड स्थानकाच्या पाचव्या प्लॅटफॉर्म रेल्वे बांधकामाला 15 दिवस स्थगिती

04:29 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी रोड स्थानकाच्या पाचव्या प्लॅटफॉर्म रेल्वे बांधकामाला 15 दिवस स्थगिती
Advertisement

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रस्तावित पाचव्या प्लॅटफॉर्मच्या प्रश्नावर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 22 सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रामानंद झा यांच्या दालनात ही बैठक झाली.

Advertisement

या बैठकीला कोकण रेल्वेचे संचालक सुनील गुप्ता, प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर एल. प्रकाश आणि उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (माल) डी. जी. बोंदे उपस्थित होते.

सावंतवाडी रोड स्थानकावर सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे भविष्यात पाचव्या प्लॅटफॉर्मसाठी जागा उपलब्ध राहणार नसल्याचा मुद्दा केसरकर यांनी बैठकीत मांडला. तसेच इमारतीच्या कॉलमखालून जाणाऱ्या केबल्सना धोका निर्माण होऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Advertisement

या मागणीवर रामानंद झा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरू असलेल्या बांधकामाला 15 दिवसांची स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचे केसरकर यांनी सांगितले. कोकण रेल्वेचे तांत्रिक पथक सावंतवाडी रोड स्थानकाची पाहणी करून पाचवा प्लॅटफॉर्म तसेच त्यावरील पर्यटक सुविधा एकाच वेळी उभारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करणार आहे. हे पथक 5 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मळगाव-रेडी मार्गासाठी नाबार्डच्या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. या माध्यमातून मळगाव, नेमळे आदी गावांना तिलारी धरणाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.

शक्तिपीठ महामार्ग मळगाव-रेडीला जोडण्याच्या प्रस्तावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे केसरकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.