For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडीत खड्डे बुजवण्यास वेग; अंधारमय भागांत पथदिवे बसवण्याचे काम सुरू; नागरिकांना दिवाळीपूर्वी दिलासा; उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या निर्देशनास यश

05:48 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडीत खड्डे बुजवण्यास वेग  अंधारमय भागांत पथदिवे बसवण्याचे काम सुरू  नागरिकांना दिवाळीपूर्वी दिलासा  उपनगराध्यक्ष ॲड  अनिल निरवडेकर यांच्या निर्देशनास यश
Advertisement
सावंतवाडी : गणेश चतुर्थीपासून सावंतवाडी शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर या समस्येची दखल घेत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहरातील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार मुख्य बाजारपेठेसह विविध भागांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला असून नागरिकांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळाला आहे.

शहरातील मोर डोंगरी परिसरात रस्त्यांवरील खड्डे आणि चरांमुळे दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर निरवडेकर यांनी तातडीने हस्तक्षेप करत शहरातील खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर मुख्य रस्त्यांवरील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Advertisement

अंधारमय भागांत पथदिव्यांची व्यवस्था

रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच शहरातील अनेक भागांत बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करावा लागत होता. सर्वोदय नगर परिसरात घराबाहेर खुर्चीवर बसलेल्या एका नागरिकाला अंधारामुळे फुरसे या विषारी सापाने दंश केल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पथदिव्यांच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सर्वोदय नगरसह कंटक पांदण आणि माठेवाडा परिसरातील अंधारमय ठिकाणी नवीन पथदिवे बसवण्याचे आदेश नगरपरिषद प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत पथदिवे बसवण्याचे काम हाती घेतले आहे.

Advertisement

खड्डे बुजवणे आणि पथदिव्यांची व्यवस्था या दोन्ही महत्त्वाच्या समस्यांवर उपाययोजना सुरू झाल्याने सावंतवाडीतील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि प्रकाशव्यवस्था सुधारण्याच्या कामांना गती मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.