भल्या पहाटे सावंतवाडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
तिघांना घेतले ताब्यात
सावंतवाडी -
सावंतवाडी तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असताना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी पोलिसांनी शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 13, 250 रुपये रोख रक्कम, 3 मोबाईल, आणि जुगाराचे साहित्य असा मिळून एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यात हेमंत शामराव रंकाळे (३५)रा- न्यू खासकीलवाडा सावंतवाडी , हा रोहन लहू पाटील (22 )जिमखाना सावंतवाडी, पांडू बापू पवार (55) शिरोडा, ता- वेंगुर्ला यांना सोबत घेऊन होळीचा खुंट ,पांगम गल्ली येथील एका उघड्या शेडमध्ये जुगार खेळत होता. यावेळी प्लास्टिक कागदाच्या आडोशाखाली ''अंदर बहार'' नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. भल्या पहाटे केलेल्या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य एका पलायन केलेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पी . डी. आय माधुरी मुळीक, , पोलीस हवालदार शिंगाडे, आदींच्या पथकाने केली. अधिक तपास पोलीस हवालदार श्री. धुरी करीत आहेत.