For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सावंतवाडी पोलीस ॲक्शन मोडमध्ये

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सावंतवाडी पोलीस ॲक्शन मोडमध्ये
Advertisement

सावंतवाडी : शहरातील नगरपालिका इमारत ते आरपीडी हायस्कूल गेटदरम्यान होणारी तीव्र वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. या मार्गावर ‘नो पार्किंग’चे फलक लावून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

नगरपालिका इमारतीसमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहने पार्क केली जात असल्याने दररोज अर्धा-अर्धा तास वाहतूक कोंडी होत होती. यामुळे एसटी बस थांबा परिसरातील प्रवासी, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही नगरपालिकेकडून उपाययोजना न झाल्याने, नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतील मागणीची दखल घेत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.

शनिवारपासून या मार्गावर 8 ठिकाणी ठळक अक्षरांत ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 70 वाहनधारकांवर वाहतूक पोलीस मयूर सावंत आणि आबा पिळणकर यांनी ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास ₹500, तर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ₹1,500 दंड आकारण्याची तरतूद आहे.

Advertisement

पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले असून, ही मोहीम अशीच कडक सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच नगरपालिकेने या परिसरात कायमस्वरूपी फलक लावून रस्त्यावर पांढरे पट्टे मारावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

आरपीडी हायस्कूल ते पालिका इमारतीदरम्यान कोणीही वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांतर्फे करण्यात आले आहे

Advertisement
Tags :

.