सावंतवाडी तालुक्यात चार मटका बुकींचे डाव उधळले
सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची धडक कारवाई
सावंतवाडी-
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अवैधरित्या सुरू असलेले मटका, जुगार, गुटखा, चरस, गांजा आदी अवैध धंदे पोलीस यंत्रणेने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सावंतवाडी तालुक्यात पोलीस यंत्रणेने कारवाईची धडक मोहीम राबवली आहे. सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एकाच वेळी सावंतवाडी तालुक्यात चार ठिकाणी सुरू असलेला मटका बुकिंगचा खेळ उधळून लावला. याप्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मटका आकडे घेणाऱ्या चौघांवर व मटका आकडे पाठवणाऱ्या तिघा मटका बुकिंग चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सावंतवाडीतील दोघे तर हरमल- गोवा येथील एका संशयित आरोपीचा समावेश आहे. या कारवाईत 6 हजार540 रोख रक्कम व 17 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व मटका जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या पोलीस यंत्रणेच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्या बड्या व्यावसायिकासह चालकांचे धाबे दणाणले आहेत. सावंतवाडी पोलिसांनी सांगेली येथे एका टपरीवर मटका आकडा मोबाईलवर घेताना छापा टाकून संदीप सखाराम लाड रा.सांगली गुरगुटवाडी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ रोख रक्कम १ हजार २५० रुपये व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व जुगार साहित्य जप्त केले. सदरचे आकडे हे हा आरोपी सावंतवाडीतील मटका बुकिंग चालक सुनील आडीवरेकर यांना पुढे पाठवीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार या मटका जुगार प्रकरणी संदीप लाड व सुनील आडीवरेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई आरोंदा बाजारपेठ मच्छी मार्केट जवळ येथे करण्यात आली. एका टपरीवर अमोल प्रभाकर विरनोडकर( 48 ) आरोंदा हा मटका आकडे घेत असताना पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत 340 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. सदर मटक्याचे आकडे हे आरोपी मटका बुकिंग चालक राजेंद्र धर्माजी रेडकर (63) हरमल - गोवा याला पाठवीत असल्याचे सांगितले. त्यानुसार कारवाईत अमोल विरनोडकर व राजेंद्र रेडकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, श्री परब, महेश अरवारी यांनी केली. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मळेवाड जकात नाका येथे छापा टाकून कारवाई केली. मळेवाड येथे एका टपरीवर कल्याण नावाचा मटका मोबाईलवर घेताना छापा टाकण्यात आला. याप्रकरणी महेश रमाकांत परब (52 ) रा. शिरोडा याला ताब्यात घेण्यात आले. तसेच सदरचे आकडे हे सावंतवाडीतील मटका बुकिंग हनू देऊलकर यांना पाठवीत असल्याचे सांगितले. त्यानुसार या गुन्ह्याप्रकरणी महेश परब व हनु देऊलकर या दोघांवर मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या कारवाईत 2 हजार 520 रोख रक्कम रुपये व 6 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. चौथी कारवाई मळेवाड येथील एका टपरीवर कल्याण नावाचा मटका जुगार आकडे घेताना आनंद यशवंत नाईक( 62) रा. मळेवाड नाईकवाडी याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत २ हजार 430 रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करून दोघांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस हवालदार अनप खंडे, ज्ञानेश्वर तवटे, अमर कांडर, महेश्वर समजीसकर प्रकाश कदम या पथकाने केली. सावंतवाडी तालुक्यात अजूनही अवैधरित्या सुरू असलेल्या धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे. अवैद धंदे रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. कारवाई मोहीम राबवताना पारदर्शकपणे राबवली जाणार असून मटका घेणारा व मटक्याचे आकडे ज्या ठिकाणी पाठवले जातात त्या मटका बुकिंग चालकावरही पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची कडक मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस यंत्रणेने राबवलेल्या अवैद्य धंदे पूर्णपणे उधळण्याच्या उचललेल्या कारवाईबाबत नागरिकांतून अभिनंदन होत आहे.