For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

घरोघरी फिरून वस्तू विकणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा; सावंतवाडी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

02:12 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
घरोघरी फिरून वस्तू विकणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा  सावंतवाडी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
Advertisement
सावंतवाडी : शहरासह परिसरातील गावांमध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून घरोघरी फिरत उत्पादनांची विक्री करणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे. अशा विक्रेत्यांना नगरपरिषदेकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी परिपत्रक जारी केले आहे.

सध्या सावंतवाडी शहर आणि लगतच्या गावांमध्ये काही अनोळखी व्यक्ती विविध उत्पादनांची विक्री करण्यासाठी घरोघरी फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या व्यक्तींना परवानगीबाबत विचारणा केली असता, सावंतवाडी नगरपरिषदेची अधिकृत परवानगी असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

मात्र, याबाबत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्याकडे विचारणा केली असता, अशा प्रकारे घरोघरी फिरून उत्पादन विक्री करण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. घरोघरी येणाऱ्या अनोळखी विक्रेत्यांवर तात्काळ विश्वास ठेवू नये. शासकीय विभाग किंवा नगरपरिषदेची परवानगी असल्याचा दावा केल्यास संबंधित परवानगीपत्राची खातरजमा करावी. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय तपशील देऊ नयेत.

Advertisement

उत्पादन खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनी, उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्रेत्याची अधिकृतता तपासून घ्यावी. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी कोणत्याही आमिषाला किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.