पाण्याअभावी जळालेल्या भातशेतीची पाहणी; सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा
सावंतवाडी | प्रतिनिधी : पावसाअभावी भातशेतीचे मोठे नुकसान झालेल्या सावंतवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.
सावंतवाडी शहरालगतच्या झिरंगवाडी, गरड, माजगाव तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी भातशेती कोरडी पडून पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन जळालेल्या भातशेती आणि बागायतींची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन निरवडेकर यांनी दिले.
या पाहणीवेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विजय साटेलकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.