सावंतवाडी नवीन न्यायालय इमारत व न्यायाधीश निवासस्थान जागेचा प्रश्न मिटला
जनता दरबारात पालकमंत्र्यांकडून हिरवा कंदील ; सावंतवाडी वकील संघटनेच्या मागणीला यश
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी येथील न्यायालयाच्या नवीन इमारती बाबत जागा उपलब्ध झाली आहे. सावंतवाडी पोलीस स्टेशन जवळील आयटीआय कडील जागा निश्चित करण्यात आली आहे . जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी तालुका बार असोसिएशनला या जागेचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत . त्यामुळे आता नवीन न्यायालय इमारत , वकिलांच्या निवासस्थानाच्या व्यवस्थेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड . परिमल नाईक व तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नीता कविटकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन लक्ष वेधले.पालकमंत्री महोदयांनी वकील संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्रालय स्तरावर तंत्रनिकेतन विभाग, महसुल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत आवश्यक त्या परवानग्या व कार्यवाही जलद गतीने होण्याचे आश्वासन दिले. व त्या धर्तीवर आदेश पारीत केले. सावंतवाडी वकील वर्गाकडुन मा. मंत्री महोदयांचे आभार मानण्यात आले व समाधान व्यक्त करण्यात आले.
सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली न्यायालयीन इमारत ही संस्थानकालीन आहे. वाढलेली वकील संख्या व न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता सदर इमारत ही फारच अपुरी ठरत आहे. परिणामी त्याचे पडसाद न्यायालयीन कामकाजावर व पर्यायाने वकीलांच्या कामकाजावर पडत असल्याने बऱ्याच समस्यांना सामना करावा लागतो. याकरिता सातत्याने वकील संघटनेकडून नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सोयीस्कर जागा मिळावी याकरिता वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती. जिल्हा न्यायालय प्रशासन विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा शासन दरबारी करण्यात आलेला होता. शासकीय गोदाम नजीक अतिरिक्त सत्र न्यायालयाची जमीन आजही न्यायालयाच्या कब्जात आहे व त्याठिकाणी न्यायालयीन इमारत व्हावी याविषयी वकील वर्ग आग्रही होते. परंतु मा. उच्च न्यायानयाच्या नियमावली नुसार सर्व सुविधांसहीत न्यायालयीन इमारत व न्यायाधीश निवासी इमारत बांधण्यासाठी सदर जागा ही अपुरी असल्याचे प्रधान वास्तु विशारद मुंबई यांनी आपला अभिप्राय दिलेला असल्याने दुसरी पर्यायी जागा सोईस्कररित्या उपलब्ध होणे आवश्यक होते.याकरीता जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक व सावंतवाडी तालुका संघटनेच्या अध्यक्ष ॲड. निता कविटकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 14/08/2024 रोजी सिंधुदुर्ग नगरी येथिल जनता दरबारात पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन न्यायालयीन इमारतीच्या जागेसाठी मागणी केली. सदर वेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्षॲड निता कवीटकर, ॲड. शामराव सावंत, ॲड संदीप निंबाळकर, ॲड. डि. के. गावकर, ॲड. निलीमा गावडे, ॲड. राजेश पराडकर, ॲड. स्वप्नील कोलगावकर, ॲड. संकेत नेवगी, ॲड. रश्मी नाईक, ॲड. अमिषा बांदेकर, ॲड. दत्तप्रसाद ठाकुर,ॲड , कौस्तुभ गावडे इ. वकील वर्ग उपस्थित होते.