मशिनमध्ये प्लास्टिक बॉटल टाकणाऱ्याला ''चॉकलेट''
सावंतवाडी नगरपालिकेचा स्वच्छ शहरासाठी उपक्रम
संतोष सावंत : सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे .क्रश बॉटल मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल टाकणाऱ्या नागरिकांना त्या बदल्यात एक चॉकलेट गिफ्ट मिळणार आहे . अशाप्रकारे शहरात २ बॉटल क्रश मशीन बसवण्यात आल्या असल्याची माहिती सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी दिली . कुठेही प्लास्टिक न फेकणारे शहर अशी ओळख निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या पालिकेच्या या पर्यावरपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे . त्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसविण्यात येणार असून केवळ ५ रुपयाचा कॉईन मशीनमध्ये टाकल्यावर त्या बदल्यात कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे. जवळपास 20 ते 25 लाख रुपये खर्च करून सावंतवाडी नगरपालिकेने स्वच्छ सुंदर शहर कायम टिकवण्यासाठी बॉटल क्रश मशीन आणि प्लॅस्टिक पिशवी वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत . सावंतवाडीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान , माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने विशेष बाब म्हणून डस्टबिनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला . नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले ,उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर , आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर नियोजन सभापती आनंद नेवगी ,पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर ,महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर व सर्व नगरसेवकांच्या सहमतीने डस्टबिन संकल्पना अंमलात आणण्याचे ठरले. प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी वैभव अंधारी ,आरोग्य निरीक्षक विनोद सावंत ,दिलीप मापसेकर, गजानन परब या सर्वांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन बसविण्याचे ठरविण्यात आले आहे .