वर्षभर जुने बंद, लाखाचा खर्च, नवेही आठवड्यात बंद; सावंतवाडी पालिकेचे घड्याळ पुन्हा ठप्प
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या नव्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले इलेक्ट्रिक घड्याळ अवघ्या आठवडाभरातच बंद पडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वर्षभरापासून बंद असलेल्या जुन्या घड्याळाच्या जागी नवे घड्याळ बसवण्यात आले; मात्र नव्या घड्याळाचीही ‘टिक-टिक’ काही दिवसांतच थांबली.
पालिकेच्या इमारतीवरील जुने घड्याळ गेल्या वर्षभरापासून बंद होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने जवळपास लाख रुपये खर्च करून नाशिक येथून अत्याधुनिक इलेक्ट्रिक घड्याळ मागवून ते नव्या धर्तीवर बसवले. नव्या घड्याळामुळे नागरिकांना वेळ पाहण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र घड्याळ बसवून आठवडा होत नाही तोच ते तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही घड्याळाची स्थिती पूर्वीसारखीच झाल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, नाशिक येथील घड्याळ दुरुस्ती करणारी टीम लवकरच सावंतवाडीत येऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. घड्याळ बसवणारी टीम ते बसवून तातडीने निघून गेली होती. त्यामुळे नेमका तांत्रिक बिघाड काय आहे, याची पाहणी केल्यानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाने सांगितले.
लाखभर रुपयांचा खर्च करून बसवलेले नवे घड्याळ इतक्या कमी कालावधीत बंद पडल्याने त्याच्या दर्जाबाबत आणि देखभालीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून घड्याळ पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.