बांदेकरांच्या राजीनाम्यावरून सावंतवाडी पालिकेत भाजप-शिंदे शिवसेनेत खडाजंगी; मुख्याधिकाऱ्यांवरही आरोप; मंडईच्या अतिरिक्त खर्चासह विविध विषयांवर वादळी चर्चा
सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याला मंजुरी देऊन नवीन सभापती नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा विषय सभेत चर्चेला आला. यावेळी भाजप नगरसेविका सुनीता पेडणेकर यांनी पाणीपुरवठा विभागातील गैरव्यवहाराबाबत काँग्रेस नगरसेवक तौकीर शेख यांच्याकडे पुरावे असल्यास ते सभेत सादर करण्याची मागणी केली.
यावर तौकीर शेख यांनी बांदेकर निर्दोष असून या प्रकरणाला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला. योग्य चौकशी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी संबंधित बिले मंजूर झाली नसल्याने बांदेकर निर्दोष असल्याचे सांगितले. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनीही संबंधित बिले मंजूर झाली नसल्याचे स्पष्ट केले.
यावर भाजप नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी शिंदे गटाला सवाल करत बिले मंजूर झाली नव्हती, तर बांदेकर यांच्या राजीनाम्याची मागणी का केली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांची बदनामी का केली, असा प्रश्न उपस्थित केला. सुनीता पेडणेकर यांनीही बांदेकर यांचा राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका मांडली.
शिंदे गटाचे गटनेते बाबू कुडतरकर यांनी सभापटलावर एक विषय असताना इतर चर्चा कशासाठी, असा सवाल केला. बांदेकर निर्दोष असतील तर त्यांचा राजीनामा का घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नीता सावंत-कविटकर यांनी पाणीपुरवठा विभागात गैरव्यवहार झाल्यामुळेच राजीनाम्याची मागणी केल्याचे स्पष्ट केले.
नगराध्यक्ष भोसले यांनी पक्षाची बदनामी होऊ नये, यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार बांदेकर यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. नगरसेवक देवा सूर्याजी यांनीही चौकशीसंदर्भात पत्र दिल्याचे सांगितले.
मंडईच्या कामासाठी 38 लाखांचा अतिरिक्त खर्च
संत गाडगे महाराज मंडईच्या कामादरम्यान जमिनीत पाणी लागल्याने डी-वॉटरिंग, वॉटरप्रूफिंग आणि अन्य कामांसाठी 38 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. हा खर्च मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
सिद्धार्थ भांबुरे यांनी या प्रकाराला संबंधित आर्किटेक्ट जबाबदार असल्याचा आरोप केला. यापूर्वीही अन्य कामांमध्ये अशाच प्रकारचा अनुभव आल्याने संबंधित आर्किटेक्टला पॅनलवर घेऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. सुधीर आडीवरेकर यांनी हा अतिरिक्त खर्च नगरपालिका निधीतून देऊ नये, अशी भूमिका मांडली.
कमी दराने कामे देण्यावरूनही चर्चा
सर्वोदय नगरातील खुली जागा विकसित करण्याच्या कामाला मुदतवाढ देण्याचा विषय सभेत आला. संबंधित ठेकेदाराने कमी दराने काम घेतले असले तरी पालिकेच्या जागेवर नागरिकांनी झाडे लावल्याने कामात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होऊ शकले नाही. ठेकेदाराला दंड न आकारता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नगरसेवक अजय गोंदवले यांनी केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी कमी दराने कामे घेतल्यामुळे कामांचा दर्जा घसरत असल्याचे सांगितले. शिंदे गटाचे बाबू कुडतरकर यांनीही कामांचा दर्जा राखण्यासाठी कमी दराने कामे देऊ नयेत, असा आग्रह धरला. यावर यापुढे कमी दराने कामे देण्यात येणार नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
माझी वसुंधरा अभियानातून साडेतीन कोटींचा निधी
माझी वसुंधरा अभियानांतर्गत 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी सावंतवाडी नगरपालिकेला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा विनियोग करण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या तत्कालीन प्रशासक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
इंदिरा गांधी संकुलातील गाळ्यांवर कारवाईचा मुद्दा
इंदिरा गांधी संकुलातील एकाच कुटुंबातील सदस्यांकडे एकापेक्षा अधिक गाळे असल्याचा मुद्दा सभेत पुन्हा उपस्थित झाला. संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, उद्यापर्यंत गाळे सील करण्यात येतील, असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले.
सिद्धार्थ भांबुरे आणि सुधीर आडीवरेकर यांनी संबंधित गाळेधारकांकडे 2021 पासून भाडे आणि प्रीमियम थकीत असतानाही कारवाई का झाली नाही, असा सवाल केला. नगराध्यक्षांचे आदेश असतानाही मुख्याधिकारी कारवाई टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगराध्यक्ष भोसले यांनी श्रेयस मुंज यांच्या तक्रारीनुसार गाळे सील करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.
इको सेन्सिटिव्हला विरोध, मग शक्तिपीठालाही करा!
काँग्रेस नगरसेवक तौकीर शेख यांनी इको सेन्सिटिव्ह झोनच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. सावंतवाडीत इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध करणाऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गालाही विरोध करावा, कारण त्या प्रकल्पातही शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
या सभेत नगरसेविका दीपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, देवा सूर्याजी, अजय गोंदवले, नीता सावंत-कविटकर आदींनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी स्नेहा नाईक, नीलम नाईक, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.
