For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी नगरपालिका दवाखाना पुन्हा गजबजणार; 5 ऑक्टोबरपासून डॉक्टरांची नियुक्ती; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दवाखान्याची पाहणी; नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून सेवा पूर्ववत

01:31 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी नगरपालिका दवाखाना पुन्हा गजबजणार  5 ऑक्टोबरपासून डॉक्टरांची नियुक्ती  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दवाखान्याची पाहणी  नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून सेवा पूर्ववत
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये, यासाठी नगराध्यक्षांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या सोमवार, 5 ऑक्टोबरपासून नगरपालिका दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यानंतर नागरिकांना नियमित आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉक्टरांसह आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी नगरपालिका दवाखाना सुरू ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणीपत्र सादर केले होते. या मागणीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह नगरपालिका दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. दवाखान्यातील उपलब्ध सुविधा, आवश्यक मनुष्यबळ आणि आरोग्य सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.

चार दिवसांत वैद्यकीय पथक उपलब्ध होणार

आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत नगरपालिका दवाखान्यासाठी डॉक्टरांसह आवश्यक वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वैद्यकीय अधिकाऱ्याची अधिकृत नियुक्ती केली जाणार असल्याने दवाखान्यातील आरोग्य सेवा पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहे.

Advertisement

सध्या सावंतवाडी येथे कार्यरत असलेले ‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ नगरपालिका दवाखान्याच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे दवाखान्याचा अधिक प्रभावीपणे वापर होऊन नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा मिळणार आहे.

नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

नगरपालिका दवाखाना हा शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची आरोग्य सुविधा आहे. दवाखाना सुरू राहणार असल्याने प्राथमिक आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली ही आरोग्य सुविधा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी दवाखाना नियमित सुरू राहावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही नगरपालिका दवाखाना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून दवाखान्यात वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाहणीवेळी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित

दवाखान्याच्या पाहणीवेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सिद्धार्थ भांबुरे, देवेंद्र टेमकर यांच्यासह नगरपालिका अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

.