For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी पालिकेचा दवाखाना सुरूच राहणार; नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांचे स्पष्टीकरण

सावंतवाडी पालिकेचा दवाखाना सुरूच राहणार  नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांचे स्पष्टीकरण
Advertisement

सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नाही. नागरिकांना पूर्वीप्रमाणेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिले.

Advertisement

सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, आतापर्यंत लाखो नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारी ही महत्त्वाची सुविधा असल्याने ती सुरू ठेवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

दवाखान्यात कार्यरत डॉक्टर मसूरकर हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ येत्या महिनाभरात संपणार आहे. त्यामुळे दवाखाना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असून, दवाखाना बंद होणार नाही, असे सावंत-भोसले यांनी स्पष्ट केले.

Advertisement

लवकरच नगरपालिकेची मासिक बैठक होणार असून, या बैठकीत दवाखान्यासाठी नवीन डॉक्टर नियुक्त करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या डॉक्टरांची पदे अस्थायी स्वरूपाची असून, ती कायमस्वरूपी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षांनी पुढे सांगितले की, सावंतवाडी शहरात लवकरच आयुष केंद्रही सुरू होणार आहे. यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय गोवा-धारगळ येथील आयुष केंद्र, सावंतवाडी नगरपालिकेचा आरोग्य दवाखाना, सालईवाडा तसेच अन्य ठिकाणच्या आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

नागरिकांना दर्जेदार आणि सातत्यपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीमुळे दवाखाना बंद होणार असल्याची चर्चा चुकीची असून, सावंतवाडी नगरपालिकेचा आरोग्य दवाखाना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल, असे श्रद्धा सावंत-भोसले यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.