For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

 सावंतवाडी नगरपरिषदेचा १४९.९९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

05:06 PM Feb 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
 सावंतवाडी नगरपरिषदेचा १४९ ९९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
Advertisement

८० कोटींच्या भुयारी गटर योजनेची घोषणा, सभागृहात खडाजंगी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा बहुचर्चित अर्थसंकल्प शुक्रवारी सभागृहात सादर करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी अर्थसंकल्प मांडताना “नागरिकांवर कोणताही नव्या करांचा बोजा न टाकता विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे ठामपणे सांगितले. तब्बल आठ वर्षांनंतर लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत अर्थसंकल्प सादर झाल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.या अर्थसंकल्पात एकूण १४९ कोटी ९९ लाख ७२ हजार ८७३ रुपयांची जमा तर ९३ कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचबरोबर सन २०२५-२६ या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकही सभागृहासमोर मांडण्यात आले.अर्थसंकल्प सादर होताच सभागृहात सविस्तर चर्चा रंगली. विरोधी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजु परब यांनी महसुली वाढ, कर वसुली, भांडवली प्रकल्पांची अंमलबजावणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी विविध तरतुदीवर आक्षेप घेतला आणि प्रशासनाला जाब विचारला. रस्ते ,अग्निशमन , निवडणूक खर्च ,झेरॉक्स खर्च , पाण्यासाठीच्या तरतुदींवरील खर्च या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत सक्रिय सहभाग घेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले.

अंदाजपत्रकाचा आर्थिक आढावा

Advertisement

सन २०२५-२६ सुधारित अंदाजपत्रकानुसार प्रारंभिक शिल्लक ९२ कोटी ५ लाख ६१ हजार ७७२ रुपये होती. तर २०२६-२७ साठी प्रारंभिक शिल्लक ७६ कोटी ६१ लाख २९ हजार ८७३ रुपये गृहीत धरण्यात आली आहे..२०२६-२७ साठी महसुली जमा २०९ कोटी ९६ लाख २० हजार रुपये अपेक्षित असून भांडवली जमा ५२ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपये प्रस्तावित आहेत. महसुली खर्च २५ कोटी ६९ लाख १४ हजार रुपये तर भांडवली खर्च ६७ कोटी ८१ लाख रुपये असा अंदाज आहे.महसुली व भांडवली उत्पन्नाच्या तुलनेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न दिसत असला तरी महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.

८० कोटींची भुयारी गटर योजना – आरोग्यदायी शहराचा संकल्प

शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ८० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाची भुयारी गटर योजना राबविण्याची घोषणा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी केली.या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान महाभियानांतर्गत प्रस्ताव सादर केला जाणार असून २०२६-२७ साठी २० कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची तरतूदही करण्यात आली आहे.यावेळी संजु परब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यांच्या भेटीची सूचना केली. त्यावर निरवडेकर यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच शिंदे यांची सर्व नगरसेवकांनी एकत्रित भेट घ्यावी, असे सुचवले.

२४ तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट

सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करण्यासाठी १७.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कुणकेरी पाळणेकोंड धरणातील गाळ काढून पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात २४ तास पाणीपुरवठा शक्य होईल, असा विश्वास निरवडेकर यांनी व्यक्त केला.पाणीपट्टीची एकूण मागणी २.१० कोटी रुपये असून १.७५ कोटी वसुलीची अपेक्षा आहे. मात्र १०० टक्के वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

मोती तलाव सुशोभीकरण व पर्यटनाला चालना

शहराची ओळख असलेल्या मोती तलावाच्या सुशोभिकरणाकडे निधीची तरतूद करण्यात आली आहे. तलाव परिसरात बोटिंग क्लब सुरू करून ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.जिमखाना मैदान, क्रीडा संकुलाचा दर्जावाढ, बहुउद्देशीय सभागृह उभारणी, उद्यान विकास, शिल्पग्राम, हेल्थ पार्क, जलतरण तलाव, जिमखाना रेस्ट हाउस आदी प्रकल्पांतून सुमारे ४२.५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

मालमत्ता कर वसुलीवर भर

नगरपरिषदेने ३.२५ कोटी रुपयांची मालमत्ता कर मागणी निश्चित केली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमाच्या कलम ११४ नुसार मोकळ्या भूखंडांवर कर आकारणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या घरपट्टीचा दर २६% आहे. भविष्यात भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्याचा विचार असून वित्त आयोगाच्या निर्देशानुसार हा बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले.मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची १००% वसुली करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भाजी मार्केट व मच्छी मार्केट फीमधून ४३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पथविक्रेत्यांची नोंदणी करून नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे. नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळे, जिमखाना मैदान, शिव उद्यान व इतर मोकळ्या जागांमधून भाडे वसुलीवर भर दिला जाणार आहे.

रस्ते, भटकी कुत्री व अग्निसुरक्षा

रस्त्यांची देखभाल व खड्डे बुजविण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी २५ लाख रुपयांची तरतूद असून या विषयावर संजु परब, देवा टेमकर, तौकीर शेख यांनी चर्चा केली. आणखी निधीची गरज असल्याचे परब यांनी नमूद केले.अग्निसुरक्षा निधीतून १.५० कोटी रुपये अपेक्षित असून अग्निशमन सेवेला बळकटी देण्याचे नियोजन आहे. बंद असलेल्या अग्निशमन बंबाबाबतही विरोधी सदस्यांनी जाब विचारला. योग्य निर्णय घेण्यात येईल, असे निरवडेकर यांनी सांगितले.कायद्यानुसार एकूण उत्पन्नातून ५% निधी महिला व बालकल्याण, दुर्बल घटक व दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येकी १२.५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजमंदिर परिसरातील घरांसाठी समाजकल्याण कार्यक्रमांतर्गत निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाईन उपस्थितीवरून वाद

सभागृहाच्या सुरुवातीलाच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले ऑनलाइन उपस्थित राहिल्याबद्दल विरोधी नगरसेविका अॅड. निता कविटकर यांनी आक्षेप घेतला.यावर प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांनी अधिकृत अर्जानुसार ऑनलाइन उपस्थिती मान्य असल्याचे सांगितले. सत्ताधारी नगरसेवक अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी कायदेशीर बाजू मांडत ऑनलाइन उपस्थिती वैध असल्याचे स्पष्ट केले. अखेर आवाजी मतदान घेण्यात आले आणि बहुमताने श्रद्धा सावंत भोसले यांना ऑनलाइन उपस्थित राहण्यास मंजुरी देण्यात आली.

विरोधकांचे सवाल, सत्ताधाऱ्यांची भूमिका

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संजु परब यांनी महसुली वाढीच्या अपेक्षा वास्तववादी आहेत का, असा सवाल उपस्थित केला. कर वसुली १००% कशी साध्य होणार? भुयारी गटर योजनेसाठी ८० कोटींचा निधी कुठून उभारणार? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.यावर उत्तर देताना अनिल निरवडेकर म्हणाले, “हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप आहे. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त कर लादलेला नाही. शासन अनुदान, काटेकोर वसुली आणि आर्थिक शिस्त यामुळे निधी उभारणी शक्य होईल.”


विकासाभिमुख पण आव्हानात्मक

 सावंतवाडी नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, पर्यटन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक कल्याण यांवर केंद्रित आहे. ८० कोटींची भुयारी गटर योजना, २४ तास पाणीपुरवठा, मोती तलाव सुशोभीकरण आणि क्रीडा सुविधा उन्नती हे प्रमुख ठळक मुद्दे ठरले आहेत.तथापि, महसुली वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, कर वसुली १००% साध्य करणे आणि जाहीर केलेल्या योजनांची वेळेत अंमलबजावणी करणे ही मोठी आव्हाने असणार आहेत. शहरवासीयांच्या अपेक्षा वाढलेल्या असताना हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात कितपत उतरतो, हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे. सावंतवाडी शहर विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. आजच्या अर्थसंकल्पीय चर्चेत विरोधी गटनेते बाबू कुडतरकर सत्ताधारी आनंद नेवगी काँग्रेसचे तौकीर शेख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे देवा टेमकर यांनी सहभाग दर्शवला सभेला नगरसेविका दिपाली भालेकर, सायली दुभाषी, नीलम नाईक ,सुकन्या टोपले ,दुलारी रांगणेकर , देव्या सूर्याजी, सुनिता पेडणेकर, बाबू कुडतरकर , आनंद नेवगी , मोहिनी मडगावकर , आदी उपस्थित होते .

Advertisement
Tags :

.