सावंतवाडी नगरपरिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनलेय
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषद एक स्वच्छ, सुंदर कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. परंतु आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. आणि ते कुरण खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावांमध्ये नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी मंगळवारी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना घेराव घालत जाब विचारणार असेही साळगावकर यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी घाई गडबडीत केलेले शहरातील रस्ते संपूर्णत: उकडून गेले आहेत . या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोक जखमी देखील होत आहेत . शहरातील सर्व पाणंदी निसरड्या झाल्या असून अनेक लोक घसरून पडत आहेत. सार्वजनिक शौचालयाची अवस्था भयानक आहे, चौका चौकात रस्त्यावरती कचरा साठलेला पाहायला मिळतो, सर्वत्र डासांचा फैलाव झालेला आहे, त्याचबरोबर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखील बंद पडलेले आहेत, गार्डन ,स्मशानभूमी अस्वच्छता या सर्व बाबींचे तीन तेरा वाजले आहेत असा आरोप साळगावकर यांनी केला.