For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मोती तलावात सांडपाणी सोडल्याप्रकरणी सावंतवाडीत तीन सोसायट्यांना प्रत्येकी 20 हजारांचा दंड

01:50 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोती तलावात सांडपाणी सोडल्याप्रकरणी सावंतवाडीत तीन सोसायट्यांना प्रत्येकी 20 हजारांचा दंड
Advertisement
शहर वार्ताहर | सावंतवाडी : सावंतवाडीतील मोती तलावात सांडपाणी आणि खाद्य स्टॉलमधील खराब पाणी सोडून तलावाचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात सावंतवाडी नगरपरिषदेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत तीन सोसायट्यांसह एका खाद्य स्टॉलचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सालईवाडा परिसरातील तीन सोसायट्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मोती तलावातील पाणी दूषित होत असल्याचा प्रश्न नगरपालिकेच्या सभागृहात चर्चेला आला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनीही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर तलावात सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांवर आणि स्टॉलचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले होते.

Advertisement

त्यानुसार आरोग्य विभागाने रविवारपासून धडक मोहीम सुरू केली. कॉलेज रोडवरील रामेश्वर प्लाझा परिसरातील एका खाद्य स्टॉलमधील खराब पाणी गटाराद्वारे मोती तलावात सोडले जात असल्याचे आढळल्यानंतर संबंधित स्टॉलचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यानंतर सांडपाणी तलावात सोडणाऱ्या सोसायट्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी फिल्टर प्लांट उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसांची दखल न घेतल्याने सालईवाडा परिसरातील तीन सोसायट्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच फिल्टर प्लांटची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Advertisement

तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी नियमित पाहणी

ड्रेनेजचे पाणी आणि खाद्य स्टॉलमधील खराब पाणी तलावात सोडले जात असल्याने मोती तलावातील पाणी शेवाळयुक्त होऊन दूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील स्टॉल्सची दररोज पाहणी करण्यात येणार असून, तलावात खराब पाणी सोडताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत यांनी दिली.

दरम्यान, संबंधित खाद्य स्टॉल बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून उभारले असल्याने या कारवाईमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एका बाजूला तलावाचे प्रदूषण रोखण्याची गरज असताना, दुसरीकडे लहान व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्नही चर्चेत आला आहे.

Advertisement
Tags :

.