सावंतवाडीत गॅस बिलाच्या नावाने OTP चोरी, औषध विक्रीतून दिशाभूल, फसवणुकींचे प्रकार उघड; भाजप नगरसेवकांची पोलिसांत धाव
या संदर्भात आडिवरेकर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही प्रकरणांबाबत स्वतंत्र निवेदने सादर करून पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले.
MNGL च्या नावाने ऑनलाइन फसवणूक
MNGL कंपनीचे नाव सांगून काही व्यक्ती मोबाईलवरून नागरिकांशी संपर्क साधत आहेत. गॅस बिल भरणे किंवा नवीन कनेक्शन जोडणी करण्याच्या नावाखाली नागरिकांकडून ओटीपी मागितला जात असून, त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः ऑनलाइन व्यवहारांची पुरेशी माहिती नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
औषध विक्रीच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल
दुसऱ्या प्रकारात काही व्यक्ती स्वतःला आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक औषधांबाबत अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांच्या घरी जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. विविध आजारांचे कारण सांगून संशयास्पद पद्धतीने औषधांची विक्री केली जात आहे. तसेच विविध संस्थांशी संबंध असल्याचे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा व्यक्ती घरोघरी फिरून माहिती गोळा करत असल्याने भविष्यात संघटित गुन्हेगारी घडण्याची शक्यताही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकरणांची सायबर क्राईम विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुधीर आडिवरेकर यांनी केली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सभापती आनंद नेवगी, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक, प्रतीक बांदेकर, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात दोन्ही निवेदनांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
