पाळणेकोंड धरणाची पातळी घटली; सावंतवाडी-कुणकेरीवर पाणीटंचाईचे सावट
ओटवणे | प्रतिनिधी : कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणाच्या पाणीपातळीत सप्टेंबर महिन्यातच मोठी घट झाल्याने सावंतवाडी शहरासह कुणकेरी गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र आहे.
सुमारे 40 वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कुणकेरी गावातील ओहोळावर पाळणेकोंड येथे पिण्याच्या पाण्यासाठी धरण बांधले. 1984 मध्ये या धरणावर आधारित नळपाणी योजना सुरू झाली. त्यानंतर 1999 मध्ये सावंतवाडी नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात झालेल्या करारानुसार संपूर्ण नळपाणी योजना नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली.
या धरणाच्या पाण्यावर कुणकेरी ग्रामस्थांचाही हक्क असूनही पाणीपुरवठ्यासाठी त्यांना सावंतवाडी नगरपालिकेवर अवलंबून राहावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. करारातील तरतुदीनुसार पाणीपुरवठ्याचे प्रमाण आणि दर बदलले जाणार नसल्याचे नमूद असतानाही पाण्याचे दर वाढविले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे कोलगाव विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर आगामी पावसाचा अंदाज न घेता धरणातील पाणी सोडण्यात आल्याने सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप सावंत यांनी केला. यंदा पाऊस कमी झाला असला तरी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेली सुमारे 45 कोटी रुपयांची नळपाणी योजनादेखील याच धरणावर अवलंबून आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा नसेल तर या योजनेचा उपयोग काय, असा सवालही महेश सावंत यांनी उपस्थित केला. धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून सावंतवाडी आणि कुणकेरी परिसरातील नागरिकांवरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळावे, अशी मागणी होत आहे.