सावंतवाडी व्यापारी संकुलातील थकबाकीचा डोंगर; 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत;109 गाळेधारकांकडून मासिक भाडे वसुली बाकी
सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, संकुलातील 138 गाळ्यांपैकी केवळ 29 गाळेधारकांनी मासिक भाडे भरले आहे. उर्वरित 109 गाळेधारकांकडे भाड्याची रक्कम थकीत आहे. विशेष म्हणजे, सर्व 138 गाळेधारकांकडून प्रीमियमची रक्कमही अद्याप वसूल झालेली नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची बाब चर्चेत आली.
संकुलातील तीन गाळे आणि 12 ओटे बंद असल्याचेही या लेखाजोख्यातून स्पष्ट झाले. 39 गाळेधारकांनी आपल्या गाळ्यांमध्ये भाडेकरू ठेवले आहेत किंवा कामगारांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू ठेवला आहे. तसेच सहा जणांकडे दोनपेक्षा अधिक गाळे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गाळ्यांचा प्रत्यक्ष वापर, भाडेकरूंची नियुक्ती आणि नियमांचे पालन याबाबतही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी गाळेधारकांनी मासिक भाडे आणि प्रीमियमची रक्कम नियमित भरली पाहिजे, असे स्पष्ट केले. नगरपालिका आपल्या उत्पन्नाचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या आकडेवारीमुळे इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे आणि प्रीमियम वसुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, थकीत रकमेच्या वसुलीसाठी पालिका प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.