For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडी शहराच्या सीमेलगत ग्रामीण भागात कचऱ्याचे ढिग; पालिकेने तातडीने हटवावेत : पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर

09:19 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी शहराच्या सीमेलगत ग्रामीण भागात कचऱ्याचे ढिग  पालिकेने तातडीने हटवावेत   पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर
Advertisement
सावंतवाडी, प्रतिनिधी : स्वच्छ आणि सुंदर सावंतवाडी शहराच्या सीमेलगत असलेल्या ग्रामीण भागात कचऱ्याचे ढिग साचत असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सावंतवाडी शहरातील काही नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा आणून शहराच्या सीमेलगत टाकत असल्याने माजगाव, चराठा, कोलगाव आणि कारिवडे या गावांच्या हद्दीतील परिसर अस्वच्छ होत आहे. हा कचरा सावंतवाडी नगरपालिकेने तातडीने हटवून कायमस्वरूपी स्वच्छता राखावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली.

सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती सुष्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

Advertisement

सभेत जितेंद्र गावकर यांनी शहराच्या सीमेलगत ग्रामीण भागात साचणाऱ्या कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील काही नोकरदार नागरिक कामावर जाताना कचरा गाडीपर्यंत कचरा पोहोचवू शकत नसल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये कचरा टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींवर अतिरिक्त कचरा व्यवस्थापनाचा भार पडत असून, त्यांना हा कचरा उचलणे अशक्य होत आहे.

सावंतवाडी नगरपालिकेने शहराच्या सीमेलगत एक किलोमीटरपर्यंतच्या ग्रामीण भागातील कचरा स्वतःच्या शहरातील नागरिकांकडून निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन उचलावा, अशी सूचना गावकर यांनी केली. या मागणीला सभेत उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिले.

Advertisement

सभापती सुष्मिता जाधव आणि उपसभापती गौरव मुळीक यांनी हा मुद्दा योग्य असल्याचे सांगत, शहराच्या सीमेलगत जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला पत्र देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

नाणोस पुलाच्या कामावर ठेकेदाराविरोधात कारवाईची मागणी

यावेळी जितेंद्र गावकर यांनी नाणोस पूल वर्षभरातच कमकुवत झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, पुलाची नव्याने उभारणी करावी आणि संबंधित ठेकेदाराला सावंतवाडी तालुक्यात पुढील मोठी कामे देऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

33 केव्ही लाईन आणि शिक्षक बदलीवरही चर्चा

वेत्ये गावातून 33 केव्ही वीजवाहिनी जोडणीच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांना नोटिसा देण्यावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. ही वीजवाहिनी मुंबई-गोवा महामार्गालगत नेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

शिरशिंगे-मळई प्राथमिक शाळेतील शिक्षक बदलीचा मुद्दाही उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित केला. चार विद्यार्थी असलेल्या शाळेत नव्याने नियुक्त महिला शिक्षकाची परस्पर चौकुळ येथे बदली कशी करण्यात आली, तसेच ही बदली कोणाच्या परवानगीने झाली, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. पंचायत समितीची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Advertisement
Tags :

.