राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी सावंतवाडीच्या पाच खेळाडूंची निवड! छत्तीसगडमध्ये होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये हेमांगी मेस्त्री (१६), भक्ती वारखंडकर (२०), हीना सारंग (१४), अवनी गावस (१४) आणि सायली सावंत (१७) यांचा समावेश आहे. पॉवरलिफ्टिंगमधील सीनियर, सब-ज्युनिअर आणि क्लासिक प्रकारांत या खेळाडूंची निवड झाली आहे.
नियमित सराव, कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर या पाचही खेळाडूंनी स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या यशामुळे सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, आगामी स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई करण्याच्या दृष्टीने त्या तयारीला लागल्या आहेत.
बेस्ट जोकर फिटनेसचे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक सौरभ वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. खेळाडूंची शारीरिक क्षमता, तंत्रकौशल्य आणि कामगिरी सुधारण्यावर प्रशिक्षणादरम्यान विशेष भर दिला जात आहे. महिला खेळाडूंनीही ताकदीच्या खेळांमध्ये पुढे यावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश आहे.
वेस्ट इंडिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाल्याबद्दल पाचही खेळाडूंचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या आगामी स्पर्धेतील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
