For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची तातडीची मदत द्या; भारतीय किसान संघाची मागणी; सावंतवाडीत मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

05:08 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची तातडीची मदत द्या  भारतीय किसान संघाची मागणी  सावंतवाडीत मोर्चा  तहसीलदारांना निवेदन
Advertisement

सावंतवाडी | ओटवणे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही बुडाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली.

Advertisement

यासाठी संघाच्या वतीने सोमवारी सावंतवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

भारतीय किसान संघाच्या म्हणण्यानुसार, यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचे अत्यल्प आणि असमान वितरण झाले. पावसात मोठे खंड पडल्याने कोकणासह विविध भागांतील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. जमीन मशागत, बियाणे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि फवारणी यांसाठी केलेला खर्च उत्पादन न मिळाल्याने वाया गेला आहे. त्यामुळे पारंपरिक नुकसानभरपाईबरोबरच प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचा विचार करून विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी संघाने केली.

Advertisement

तालुकाध्यक्ष पांडुरंग हळदणकर यांनी खरीप हंगामातील बुडालेल्या भांडवलासाठी हेक्टरी 50 हजार रुपये आपत्कालीन निधीतून थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी केली. तसेच पिकांच्या प्रत्यक्ष नुकसानीनुसार नियमित भरपाईही देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा मंत्री अभय भिडे यांनी रब्बी हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि आवश्यक कृषी निविष्ठा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ही सामग्री पेरणीची वेळ निघून जाण्यापूर्वी गावपातळीवर उपलब्ध करून द्यावी, तसेच पंचनाम्याच्या प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदत लांबू नये, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार यांनी पीकविमा नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी केली. तसेच पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन, नवीन रब्बी पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि आपत्तीचा कालावधी संपेपर्यंत पीक कर्जावरील व्याजाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन अनुदानाचा लाभ नियमित व थकीत कर्जदारांसह सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि बहुवार्षिक फळबागांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी संघाने केली.

मोर्चाला भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग हळदणकर, जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार, जिल्हा कार्यकारणी सदस्य सखाराम नाईक, प्रवीण परब तसेच विविध ग्राम समित्यांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.