तळवडे-निरवडे परिसरात भातशेती करपली, पाऊस गायब, वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; “आता जगायचं कसं?” शेतकऱ्यांचा सवाल
सावंतवाडी : वन्यप्राण्यांकडून भातशेती आणि बागायतीचे नुकसान, त्यातच ऑगस्टपासून पावसाने पाठ फिरवल्याने सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. तळवडे-निरवडे परिसरातील भातशेती पाण्याअभावी करपून गेली असून अनेक शेतकऱ्यांनी “वर्षभर खायचे काय? आता जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित केला आहे.
यंदा खरीप हंगामात भाताची लागवड करूनही अनेक शेतांच्या लोंब्यांमध्ये दाणे भरलेले नाहीत. ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्याने वाफ्यांमध्ये पाणी राहिलेले नाही. नदी-नाले कोरडे पडले असून शेतजमिनींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. हिरवीगार दिसणारी भातशेती आता करपून काळी-करडी पडली आहे. त्याचबरोबर चारा सुकल्याने पशुधनासाठीही संकट निर्माण झाले आहे.
वन्यप्राण्यांकडूनही शेतीचे नुकसान
सावंतवाडी तालुक्यात गवे, रानडुक्कर आणि रानगाई यांच्याकडून भातशेती तसेच बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि दुसरीकडे पावसाअभावी पिकांचे नुकसान, अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव यांनी तळवडे येथे शेतांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. करपलेली भातशेती आणि सुकलेला चारा पाहून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. “ही बाब आमदार दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून देणार,” असे आश्वासन त्यांनी दिले.
पेंढ्यासाठीही नुकसानभरपाईची मागणी
शेतकऱ्यांनी शासनाकडे केवळ भाताच्या नुकसानीचीच नव्हे, तर भाताच्या पेंढ्यालाही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भाताचे उत्पादन हातातून गेले असून पशुखाद्यासाठी लागणारा चारा देखील उपलब्ध होणार नसल्याने दुहेरी फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सह्याद्री पट्टा आणि खलाटे परिसरातही पाणीटंचाईची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी डिसेंबरपर्यंत पाणी असणारे नदी-नाले यंदा सप्टेंबरमध्येच कोरडे पडल्याने आगामी काळात विहिरींच्या पाणीपातळीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोमवार, 28 सप्टेंबर रोजी सावंतवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सभापती सुष्मिता जाधव यांनी दिली.