For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गाव तेथे काँग्रेस’ अभियानाला सावंतवाडीत वेग; तालुका काँग्रेसच्या बैठकीत संघटनबांधणीवर भर; महागाईविरोधी आंदोलनाची तयारी

03:08 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गाव तेथे काँग्रेस’ अभियानाला सावंतवाडीत वेग  तालुका काँग्रेसच्या बैठकीत संघटनबांधणीवर भर  महागाईविरोधी आंदोलनाची तयारी
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या जीवनरक्षा कार्यालयात पार पडली. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच गावागावांत संपर्क वाढविण्यावर भर देण्यात आला. ‘गाव तेथे काँग्रेस’ हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Advertisement

बैठकीत वाढती महागाई आणि स्थानिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारण्याबाबत चर्चा झाली. पक्षाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावपातळीवर संपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला.

प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा पदाधिकारी आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षवाढीबाबत मार्गदर्शन केले. विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Advertisement

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी आरोग्य सुविधांशी संबंधित माहिती उपस्थितांसमोर मांडली. तसेच पक्षाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक योजनांची माहिती पोहोचविण्याबाबतही चर्चा झाली.

पुष्पसेन सावंत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बैठकीदरम्यान माजी आमदार स्व. पुष्पसेन सावंत यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.

सुमेधा सावंत, निषाद बुरान यांच्यावर नवी जबाबदारी

बैठकीत सुमेधा सावंत यांची सावंतवाडी महिला शहराध्यक्षपदी, तर निषाद बुरान यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नियुक्तीनंतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, सुभाष दळवी, नगरसेवक तौकीर शेख, ॲड. राघू नार्वेकर, पीटर फर्नांडिस, कौस्तुभ पेडणेकर, आनंद आयरे, विठ्ठल केदार, सगुण गावकर, संतोष कासकर, संदीप सुखी, बाळा नमशी यांच्यासह युवक, महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

.